Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची पाकिस्तानसह सौदी, थायलंडमध्येही चर्चा; नेमकं कसला 'शोध' घेतला जातोय पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:39 PM2022-06-24T12:39:01+5:302022-06-24T12:46:03+5:30

Eknath Shinde Top Search: शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेलं असताना एक आश्चर्यकार माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदेंची चर्चा केवळ महाराष्ट्र किंवा भारत नव्हे, पाकिस्तानातही चर्चा आहे. नेमकं काय प्रकरण आहे पाहा...

Eknath Shinde Top Search: शिवसेनेत मोठं बंड करुन खळबळ उडवून दिलेल्या एकनाथ शिंदेंची चर्चा आता पाकिस्तानातही होऊ लागली आहे. पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची माहिती इंटरनेटवर सर्च केली जात असल्याचं दिसून आलं आहे. पाकिस्तानात युझर्स एकनाथ शिंदे यांची माहिती जाणून घेण्यास रस दाखवत आहेत. पाकिस्तानच्या इंटरनेट सर्चमध्ये एकनाथ शिंदे पहिल्या क्रमाकांवर आहेत.

पाकिस्तानसह सौदी अरेबिया, थायलँड, कॅनडा, नेपाळ, मलेशिया, बांगलादेश आणि जपान या देशांमध्येही एकनाथ शिंदे यांच्याबाबतची माहिती इंटरनेटवर सर्च केली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानच्या इंटरनेट सर्चमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

पाकिस्तानात एकनाथ शिंदे नावानं ५० टक्के लोकांनी सर्च केलं आहे अशी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात गुगल सर्चमध्ये एकनाथ शिंदे टॉपवर आहेत. त्यांनी याबाबतीत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनाही मागे टाकलं आहे.

एकनाथ शिंदे यांची पाकिस्तान पेक्षा सौदी अरेबियात अधिक चर्चा आहे. सौदीमध्ये इंटरनेटवर ५७ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबतची माहिती सर्च केली आहे.

जगातील ३३ देशांमध्ये गेल्या तीन दिवसात प्रामुख्यानं ५ नेत्यांबाबत माहिती शोधली गेली आहे. यात एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे. शिंदे यांच्याबाबत पाकिस्तानात ५४ टक्के, सौदी अरेबियात ५७ टक्के, मलेशियात ६१ टक्के तर नेपाळमध्ये ५१ टक्के लोकांना माहिती सर्च केली आहे.

बांगलादेशमध्ये एकनाथ शिंदे यांच्याबाबत ४२ टक्के लोक सर्च करत आहेत. तर थायलंडमध्ये ५४ टक्के, जपानमध्ये ५९ टक्के आणि कॅनडामध्ये ५५ टक्के लोकांकडून शिंदे यांच्याबाबत सर्च केलं गेलं.

एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत, ते काय करतात, एका रिक्षावाल्यापासून ते मंत्री इथवरचा त्यांचा प्रवास, त्यांनी ४० आमदार फोडून शिवसेनेला कसं धोक्यात आणलं? याबाबत नेटिझन्स गुगलवर सर्च करत आहेत.

एकनाथ शिंदे गटात आज एकूण आमदारांची संख्या ५० होण्याची माहिती समोर आली आहे. त्यात शिंदेंकडून आजच राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारचं समर्थन काढून घेत असल्याचं पत्र दिलं जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज सर्व आमदारांची बैठक होणार असून पुढील निर्णय घेतले जातील असं म्हटलं आहे.

दुसरीकडे एकनाथ शिंदे भाजपा नेत्यांच्या संपर्कात असून भाजपाकडून सत्ता स्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. यापुढची रणनिती कशी असेल याबाबत शिंदे गट आणि भाजपा नेत्यांमध्ये खलबतं सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. पण राज्यपातळीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडींमध्ये भाजपाचा कोणताही हात नाही असा दावा त्यांनी केला आहे.

राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते मात्र काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले होते. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वामध्ये महाराष्ट्रातील घडामोडींवर तब्बल अडीच तास खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस आज तातडीनं मुंबईत देखील परतले आहेत. दिल्ली दौऱ्यानंतर फडणवीसांच्या मुंबईतील सागर या निवासस्थान भाजपाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू आहे.

शिवसेनेनं आता कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांनी आता ही कायदेशीर लढाई झाली आहे. कोर्टाची लढाई असेल तर कोर्टात लढू, रस्त्यावरची लढाई असेल तर रस्त्यावरही लढू आणि आम्हीच जिंकू असं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे. शिंदे गटाची वेळ आता निघून गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता संघर्ष शिगेला पोहोचण्याचं संकेत आहेत.