नाद करा, पण अमेरिकेचा कुठं! अतिराष्ट्रवादी जिनपिंग यांना चीनच्या तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 03:03 PM2020-09-30T15:03:27+5:302020-09-30T15:11:15+5:30

युआन यांनी कोरोना व्हायरस संपल्यानंतर अमेरिकेची चीनच्या प्रती असलेली नीती कशी असेल यावर एक लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी जिनपिंग यांना हा इशारा दिला आहे.

चीनचे परदेशी प्रकरणांच्या आघाडीच्या विशेषज्ञांनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना गंभीर इशारा दिला आहे. जिनपिंग यांनी अति राष्ट्रवादापासून लांब रहायला हवे असे म्हटले आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे थिंक टँक चायना इन्स्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीचे विशेषज्ञ युआन नानशेंग यांनी देशाला सावध केले आहे. अमेरिकेला हलक्यात घेण्याची चूक करू नका असे ते म्हणाले आहेत.

युआन यांचे हे वक्तव्य अशावेळी समोर आले आहे जेव्हा जिनपिंग सरकार 'वुल्‍फ वॉरियर डिप्‍लोमेसी' च्या नावावर संपूर्ण जगभरात अतिआक्रमक भूमिका घेतली आहे.

युआन यांनी कोरोना व्हायरस संपल्यानंतर अमेरिकेची चीनच्या प्रती असलेली नीती कशी असेल यावर एक लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी जिनपिंग यांना हा इशारा दिला आहे. अमेरिकेसोबत जास्त सतर्क रहा, असे सांगितले आहे.

अमेरिका आणि चीन एकमेकांपासून दूर होणारा रस्ता धरतील याची शक्यताही कमी असल्याचे युआन म्हणाले. तरीही ही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अमेरिकेच्या नादी लागू नका असा इशारा त्यांनी दिला आहे.

चीनचे जगभरात कोरोना महामारीवर मदत देण्याचे दावे आणि अमेरिकेला नीट हाताळता न आल्याचा आरोपांनंतरही युआन यांनी जिनपिंग सरकारला काळजीपूर्वक पाऊले उचलण्याचा सल्ला देत आहेत.

कोरोना व्हायरसचे संकट म्हणजे चीनसाठी ऐतिहासिक संधी असल्याच्या दृष्टीने चिनी सरकार पाहत आहे. ही एक मोठी रणनीतिक चूक आहे, असे युआन म्हणाले.

जर चीनने देशात अतिराष्ट्रवाद फोफावायला मदत केली तर आंतरराष्ट्रीय समुदाय याकडे चुकीच्या नजरेने पाहू शकतो. यामुळे चीन चायना फर्स्टची नीती राबवतोय असा त्यांचा समज होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.

युआनने सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. याचा अर्थ हा नाही की चिनी अर्थव्यवस्था याचा फायदा उठवेल. परंतू अमेरिकेपासून सावध रहायला हवे, असे ते म्हणाले.

अमेरिका त्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञान, सर्वात मोठा बाजार, आर्थिक बाजार आणि जागतिक चलनाच्या जोरावर सर्वात आधी या संकटातून बाहेर पडणार आहे. तसेच जुन्या मार्गावर वेगाने मार्गक्रमण करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.