CoronaVirus News : "डोनाल्ड ट्रम्प हजारो लोकांच्या मृत्यूला जबाबदार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 09:11 PM2020-05-11T21:11:08+5:302020-05-11T21:49:17+5:30

हजारो अमेरिकन लोकांच्या मृत्यूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचे प्रख्यात समाजशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचा फायदा आणि व्यावसायिकांचा खिशा भरण्यासाठी अमेरिकन लोकांचे जीव धोक्यात घातल्याचा आरोपही चॉम्स्की यांनी केला आहे.

ब्रिटीश वृत्तपत्र 'द गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत चॉम्स्की म्हणाले की, "या दशकाच्या सर्वात मोठ्या आरोग्याच्या संकटादरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देशाचे रक्षक असल्याचे नाटक करत सामान्य अमेरिकन लोकांच्या पाठीवर वार करीत होते."

अमेरिकेचे पुन्हा अध्यक्ष होण्याचे स्वप्न पाहणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांनी श्रीमंत उद्योजकांच्या हितासाठी आरोग्यसेवा आणि संसर्गजन्य रोग संशोधनाचा खर्च कमी करण्यासारखे पाऊल उचलले, असे चॉम्स्की म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प आपल्या कार्यकाळात प्रत्येक वर्षी संस्थांच्या निधीत कपात करण्याचे काम करत आहेत. सरकारी निधी कपात सुरु आहे. लोकांना धोक्यात आणले जात आहे. मात्र, श्रीमंत आणि व्यावसायिकांचा फायदा वाढविला जात आहे, असे चॉम्स्की यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यांच्या राज्यपालांवर कोरोनाविरोधत लढण्याची जबाबदारी सोपविली आणि आपल्या आपल्या कर्त्यव्याकडे पाठ फिरविली. सर्व लोकांना जिवे मारण्याची आणि त्यांचे निवडणूक राजकारण सुधारण्याची ही त्यांची रणनीती आहे, असा आरोप चॉम्स्की यांनी केला आहे.

अमेरिकेतील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला चॉम्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवत सांगितले की, फक्त अमेरिकेतील नाही तर संपूर्ण जगातील लोकांच्या मृत्यूला डोनाल्ड ट्रम्प जबाबदार आहेत.

अमेरिकन लोकांविरोधातील आपला गुन्हा लपविण्यासाठी ते कोणाला तरी बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक आरोग्य संघटनेचा (डब्ल्यूएचओ) निधी रोखण्याच्या निर्णयामुळे येमेन आणि आफ्रिकन खंडातील मृत्यूंमध्ये वाढ होईल, असेही चॉम्स्की यांनी सांगितले.

युरोपियन युनियनवर (ईयू) चॉम्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, " कोरोना महामारी दरम्यान ईयूने आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या नाहीत. हे संकट युरो करेंसी ब्लॉकला उलथू-पालथू शकते. युरोझोन या संकटाचा सामना करू शकेल असे मला वाटत नाही."

युरोपियन युनियन नेत्यांनी 540 अब्ज युरोच्या आपत्कालीन पॅकेजवर सहमती दर्शविली आहे, परंतु निधी वाटपाबाबत संस्थेच्या सर्व सदस्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. जेव्हा इटली आणि स्पेन कोरोनाच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात होते, तेव्हा त्यांना ईयूकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकले नाही, असेही चॉम्स्की यांनी म्हटले आहे.