किम जोंग उनचा मृत्यू?; आजोबा अन् वडिलांचे छायाचित्र हटवल्याने पुन्हा चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:50 PM2020-05-19T17:50:33+5:302020-05-19T18:26:21+5:30

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच किम जोंग उन कोमात गेले असल्याचा दावा ब्रिटनच्या Dailymail या वृत्तपत्राने केला होता. त्याचप्रमाणे किम जोंग उन यांच्या मृत्यू झाला असल्याचा दावा देखील आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता.

मात्र किम जोंग उन २० दिवसांनंतर जगासमोर आले होते. उत्तर कोरीयाई नेते प्योंगयांग यांच्या उत्तरेकडील सनुचोन येथे एका फॅक्टरीच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी किम जोंग सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते.

२० दिवसांनी जगासमोर आल्यानंतर किम जोंग उन पूर्णपणे ठणठणीत दिसत होते. त्यांनी स्वतःच संपूर्ण फॅक्‍ट्रीची पाहणी केली आणि उद्घाटन समारंभातही भाग घेतला होता. यावेळी येथे उपस्थित अलेल्या हजारो लोकांनी हात हलवून त्यांचे स्वागत केले. एवढेच नाही, तर किम जोंग यांनीही त्यांच्यात जाऊन त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला होता.

मात्र २० दिवसांनी जगासमोर आलेले किम जोंग उन नाही, तर त्यांचा ड्युप्लीकेट असल्याचा दावा आता करण्यात आला होता. त्यामुळे किम जोंग उनच्या प्रकृतीबाबत आता पुन्हा चर्चांना उधाण आले होते. त्यातच आता किम जोंग उन यांचे आजोबा आणि वडिलांचे किम इल सुंग या चौकात लावण्यात आलेले छायाचित्र काढण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकादा किम जोंग उनच्या प्रकृतीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

किम जोंग उन यांच्या आजोबा आणि वडिलांचे छायाचित्र अचानकपणे काढण्यात आले आहे. तसेच हे छायाचित्र काढून तिन जणांच्या पोस्टरसाठी जागा तर तयार करण्यात येत नाही ना, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

याशिवाय चौकाच्या पश्चिम बाजूने वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.तसेच उत्तर कोरियातील परंपरेनुसार जिवंत असलेल्या नेत्याचा पुतळा किंवा पोर्ट्रेट तयार करता येऊ शकत नाही. यामुळे किम जोंग उनच्या प्रकृतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

किम इल सुंग चौकाचे यापूर्वी २०१२मध्ये नूतनीकरण करण्यात आले होते. किम जोंग इल यांच्या मृत्यूनंतर या चौकाचे नूतनीकरण करण्यात आले होते. आता येथून त्यांचे पोर्ट्रेट हटविण्यात आल्याची घटना उत्सुकता वाढवणारी आहे. तसेच येत्या काही दिवसांत याबाबत स्पष्ट होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यामांकडून सांगण्यात येत आहे.