घाबरू नका! पुन्हा पॉझिटिव्ह येणाऱ्या कोरोना रुग्णांचं आता नो टेन्शन, अभ्यासात नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 01:50 PM2020-05-21T13:50:09+5:302020-05-21T16:28:08+5:30

काही देशांत कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे जगभरातले आरोग्य तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांना मोठी काळजी लागून राहिली होती. पण...

जगात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला असून, अनेक देशांना त्यावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेलं नाही. काही देशांत कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण पुन्हा एकदा पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे जगभरातले आरोग्य तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांना मोठी काळजी लागून राहिली होती.

तसेच कोरोनाची दुसरी लाट येणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानं नागरिक घाबरलेले होते. परंतु कोरोनाची तिसरी लाट आली तरी ती फारशी प्रभाव दाखवणार नसल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे वैज्ञानिकांसह जगभरातल्या आरोग्य तज्ज्ञांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दक्षिण कोरियाच्या सीडीसीच्या (रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रे) संशोधकांनी या साथीच्या आजाराच्या पुनरावृत्तीवर अभ्यास केला, ज्यात पुन्हा उद्भवणारा कोरोना फार प्रभावशाली नसेल, असं समोर आलं आहे.

संशोधकांना असे पुरावे सापडले आहेत की, कोरोना विषाणूतून बरे झाल्यानंतर जे रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळत आहेत ते संक्रमित रुग्ण नसल्याचा खुलासा या अभ्यासातून करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा कोणताही धोका नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

या व्यतिरिक्त शरीरात तयार केलेल्या नव्या अँटीबॉडीजमुळे बरे झालेले कोरोना रुग्ण पुन्हा आजारी पडण्याची शक्यता नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या 285 रुग्णांवर शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला आहे, जे बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या टेस्टमध्ये सकारात्मक आढळले.

या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग पसरलेला नाही आणि विषाणूच्या नमुन्यांची चाचणी घेतली असता जीवाणू वाढलेले नसल्याचं आढळलं आहे.

म्हणजेच ज्या रुग्णांना आधी कोरोनाचा संसर्ग झालेला आहे, अशा रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचे मृत कण राहतात म्हणून ते पॉझिटिव्ह आढळतात.

ज्या देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण बरे झाले आहेत आणि जे देश लॉकडाऊन उघडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत, अशा देशांसाठी हा अहवाल एक सकारात्मक बाब आहे.

दक्षिण कोरियाच्या या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, कोरोनातून बरे झालेल्या लोकांपासून कोणताही धोका नाही.

अभ्यासानुसार दक्षिण कोरियामधील आरोग्य अधिकारी वारंवार चाचण्या करूनही बरे झालेल्या कोरोना रुग्णांना संक्रमित मानत नाहीत.

कोरोना व्हायरस न्यूक्लिक एसिडच्या पीसीआर चाचण्या मृत आणि जिवंत विषाणू कणांमध्ये फरक दाखवू शकत नाही, म्हणून ते रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यामुळे कोरोनातून बरी झालेली व्यक्ती पुन्हा संक्रमित झाल्यास तिच्यापासून कोणताही धोका नाही.

दक्षिण कोरियाचे संशोधन अँटीबॉडीज चाचणीबाबत सुरू असलेल्या प्रयोगातही फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांना असा विश्वास आहे की, अँटीबॉडीज बहुधा व्हायरसविरुद्ध काही प्रमाणात संरक्षण प्रदान करतात.

पण ते कोरोना रुग्णाचं किती काळ संरक्षण करतील, याचे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत किंवा ते शरीरात प्रतिकारशक्ती किती काळ टिकवून ठेवू शकतात हेसुद्धा ठाऊक नाही.

दक्षिण कोरियाच्या या अभ्यासानंतर अधिका-यांनी म्हटले आहे की, सुधारित नियमांनुसार कोरोना विषाणूतून बरे झालेल्या रुग्णांनी क्वारंटाइन राहून त्यांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे पुन्हा सकारात्मक आढळले तरी त्याची चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.

सीडीसीने एका अहवालात म्हटले आहे की, 'क्वारंटाइन केलेले रुग्ण पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले तरी त्यांना आता पीसीआर री-डिटेक्टेड केस म्हटले जाणार आहे.