Coronavirus: कोरोना लसीच्या चाचणीत भारताला मोठी आशा; लहान मुलं अन् वृद्धांवर होणार प्रयोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 08:23 AM2020-05-23T08:23:16+5:302020-05-23T08:28:37+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील १९० हून अधिक देशातील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ५३ लाखांहून जास्त लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत तर ३ लाख ४० हजाराहून जास्त मृत्यू झाले आहेत.

भारतातही १ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी देशात गेल्या २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना यात एक आनंदाची बातमी आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लसीची चाचणी सुरु आहे. ती आता दुसऱ्या टप्प्यात पोहचली आहे. या टप्प्यात लसीचा मानवांवर प्रयोग करण्यात येणार आहे.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर १० हजाराहून जास्त लोकांना कोरोनाची लस देण्याची तयारी केली आहे. भारतानेही या लसीची चाचणी ८० टक्के यशस्वी होण्याची आशा व्यक्त केली आहे.

मागील महिन्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी लसीचा प्रभाव आणि सुरक्षा तपासणी करण्यासाठी १ हजाराहून अधिक स्वयंसेवकांवर चाचणी केली होती. वैज्ञानिकांनी शुक्रवारी घोषणा केली आहे की, आता ब्रिटनमधील लहान मुले आणि वृद्ध माणसांसह १०, २६० जणांवर लसीची चाचणी करण्यात येणार आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत लस विकसित करण्याच्या पथकाचे नेतृत्व करणारे अ‍ॅन्ड्र्यू पोलार्ड म्हणाले, क्लिनिकल स्टडी अधिक प्रगतीपथावर आहेत. वृद्धांमध्ये ही लस किती प्रभावी आहे याचा आम्ही तपास करणार आहोत. जेणेकरुन ही लस संपूर्ण लोकसंख्येस संरक्षण पुरवू शकते की नाही हे निश्चित करता येईल.

ही लस कधीपर्यंत तयार होईल यावर पोलार्डने एका वेबसाईटला सांगितले आहे की, या लसीबाबत कोणताही अंदाज बांधता येत नाही. पूर्णपणे सक्षम लस कधी तयार होईल याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

ही लस कधी तयार होईल आणि लसीपासून बचाव करणे शक्य आहे याची हमी कधी मिळू शकते हे सांगणे कठीण आहे असं पोलार्ड यांनी सांगितले.

त्याचबरोबर जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे मुख्य कार्यकारी अदार पूनावाला यांनी म्हटले आहे की, कोविड -१९ लस तयार होण्यासाठी 2 वर्षे लागतील. या वर्षाच्या अखेरीस ही लस मिळणे शक्य आहे. पण हे सर्व यूके लसीच्या चाचणीवर अवलंबून आहे जे आता दुसर्‍या टप्प्यात पोहोचले आहे.

पुण्यातील एसआयआय सध्या यूकेमधील ऑक्सफोर्ड, यूएसमधील कोडजेनिक्स आणि ऑस्ट्रेलियन बायोटेक फर्म थेमिस यांनी विकसित केलेल्या लस उमेदवारांवर काम करत आहे. यात पूनावाला यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लसीकडून सर्वाधिक अपेक्षा दर्शविल्या आहेत.

कोरोना विषाणूविरूद्ध लस विकसित करण्याचे इतर प्रमुख दावेदार म्हणजे यूएसमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ एण्ड मॉडर्ना इंक. आणि इनव्हिओ फार्मास्युटिकल. या दोन्ही लसींमध्ये प्रयोग सुरु आहेत. रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असलेल्या एंडोबॉडीज विकसित करण्यासाठी कोरोना विषाणूचे अनुवांशिक शरीरात प्रत्यारोपण केले जात आहे.

कोरोना व्हायरसवर जगातील बहुतांश वैज्ञानिक लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. पण अद्याप कोणालाही ठोस परिणाम आढळून आला नाही. काही वैज्ञानिक कोरोनावर लस शोधण्याशिवाय कोरोना विषाणूशी लढणाऱ्या अँन्टीबॉडीज विकसित करण्याचंही काम करत आहे.