CoronaVirus : भयावह! Omicron व्हेरिअंटवर आता सिंगापूरचा नवा रिपोर्ट, चिंता वाढवणारी माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:51 PM2021-12-06T17:51:36+5:302021-12-06T18:01:02+5:30

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की RT-PCR चाचणी ही ओमायक्रॉनसह कोरोनाच्या कोणत्या व्हेरिअंटची ओळख पटविण्यास प्रभावी आहे. यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी अत्यंत आवश्यक आहे.

कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटने संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केली आहे. त्याचा फैलावही अत्यंत वेगाने होऊ लागला आहे. शास्त्रज्ञांनी या व्हेरिअंटसंदर्भात सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनंतर आता सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानेही या प्रकाराशी संबंधित काही नवीन गोष्टी जगासमोर ठेवल्या आहेत.

एका अपडेटमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे, प्राथमिक दृष्ट्या समोर आलेल्या माहितीवरून, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिअंट डेल्टा आणि बीटापेक्षाही अधिक संसर्गजन्य आहे आणि यापासून पुन्हा संसर्ग होण्याचा धोकाही दोन्हीपेक्षा अधिक आहे.

कोरोनातून बरे झालेले लोकही होतायत संक्रमित - सिंगापूरमधील अग्रगण्य चॅनल न्यूज एशियाने, ओमायक्रॉन व्हेरिअंटसंदर्भात मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, "कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना पुन्हा ओमायक्रॉन व्हेरिअंटचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते." सिंगापूरमध्येही ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची नोंद होत आहे.

सिंगापूरमध्ये रविवारी एका 37 वर्षीय व्यक्तीला ओमाक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. या व्यक्तीने लसीचे दोन्ही डोस घेतले होते. ही व्यक्ती 1 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून सिंगापूरला परतली होती. रविवारी, सिंगापूरमध्ये कोरोनाचे 552 नवे रुग्ण समोर आले आहेत, तर 13 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

मंत्रालयाने म्हटले आहे की, त्यांनी गेल्या काही दिवसांत दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांतील अहवालांची समीक्षा केली आणि ते तज्ज्ञांकडून सर्व प्रकारची माहिती गोळा करत आहेत. तसेच 'जगभरात ज्या प्रकारे नवा व्हेरिअंट पसरत आहे आणि रुग्ण संख्या वाढत आहे, ते पाहता सिंगापूरमध्येही आगामी काळात आणखी रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे आम्हाला अधिकाधिक टिस्टिंग वाढवावी लागेल.'

कोरोना लस ओमायक्रॉन व्हेरिअंटवर काम करेल की नाही? यासंदर्भात, अभ्यासात माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की सध्याची लस या व्हेरिअंटवरही काम करेल आणि लोकांना गंभीर आजारांपासून वाचवेल. यामुळे लोकांनी लसीचे दोन्ही डोस लवकरात लवकर घ्यायला हवेत.

ओमायक्रॉनची लक्षणं सामान्य - सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की ओमायक्रॉनमध्ये बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. सध्या या व्हेरिअंटमुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आलेले नाही.

केवळ घसा खवखवणे, थकवा येणे आणि खोकला यांसारखी सामान्य लक्षणेच यात दिसून आली आहेत. दक्षिण आफ्रिकेत तरुणांना अधिक संसर्ग झाल्याच्या वृत्तासंदर्भात मंत्रालयाने म्हटले आहे की, लोकांमध्ये अधिक संसर्ग पसरल्याने हे घडले असावे.

अधिक लोकांना ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याचे एक कारण असेही असू शकते की, रुग्णालयात इतर आजारांचे लोक भरती झालेले असावेत आणि ओमायक्रॉन पसरल्यामुळे रुग्णालयातही काहींना या व्हेरिअंटचा संसर्ग झालेला असावा. मात्र, सध्या तरी हा व्हेरिअंट किती गंभीर आहे, यासंदर्भात काहीही सांगितले जाऊ शकत नाही. दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार, या व्हेरिअंटमुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांना एक ते दोन दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की RT-PCR चाचणी ही ओमायक्रॉनसह कोरोनाच्या कोणत्या व्हेरिअंटची ओळख पटविण्यास प्रभावी आहे. यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी चाचणी अत्यंत आवश्यक आहे.

Read in English