CoronaVirus News : अरे व्वा! तब्बल 10 महिने, 43 वेळा टेस्ट 'पॉझिटिव्ह' आलेल्या आजोबांनी जिंकली कोरोनाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 07:04 PM2021-06-24T19:04:46+5:302021-06-24T19:24:06+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. काही ठिकाणी रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 180,451,320 वर पोहोचली आहे. तर 3,909,322 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन आणि क्वारंटाईनच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनावर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. सलग 10 महिने कोरोना पॉझिटिव्ह राहिलेल्या 72 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्रिटनमधील एक 72 वर्षीय व्यक्ती सलग 10 महिने कोरोना पॉझिटिव्ह राहिली होती. कोरोना संसर्गाचं आतापर्यंतचं हे सर्वाधिक लांब प्रकरण मानलं जात आहे. संशोधकांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

इंग्लंडमधील ब्रिस्टल येथील सेवानिवृत्त ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर डेव स्मिथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझी 43 वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यात माला सात वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले"

"मी माझ्या अंत्यसंस्काराची योजना देखील आखली होती. शेवटी हार मानून मी कुटूंबाला बोलावून सर्वांना निरोप दिला होता, गुडबाय म्हटलं होतं" अशी माहिती त्यांनी बीबीसी टीव्हीला दिली आहे.

ब्रिस्टल अँड नॉर्थ ब्रिस्टल ट्रस्ट विद्यापीठाचे संसर्गजन्य रोग सल्लागार एड मोरन यांनी "स्मिथ यांच्या शरीरात संपूर्ण काळ कोरोना व्हायरस सक्रिय होता. अमेरिकन बायोटेक फर्म रेगेनरॉनने विकसित केलेल्या सिंथेटिक अँटीबॉडीजच्या कॉकटेलने उपचार केल्यावर स्मिथ बरे होऊ शकले."

"केस वेगळी असल्याने उपचार पद्धतीला परवानगी देण्यात आली होती. सध्या यूकेमध्ये ही पद्धत वैद्यकीयदृष्ट्या स्वीकारली जात नाही" असं म्हटलं आहे. मला माझे जीवन परत मिळाले आहे असं स्मिथ यांनी म्हटलं आहे.

"रेगेनरॉनचे औषध घेतल्यानंतर 45 दिवसांनी आणि पहिल्यांदा पॉझिटिव्ह आल्याच्या 305 दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी पत्नीबरोबर शॅम्पेनची बॉटल उघडून आनंद साजरा केला" असं स्मिथ यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.