CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 08:22 PM2020-06-12T20:22:11+5:302020-06-12T20:40:58+5:30

कोरोना व्हायरसची सर्व सामान्य लक्षणं म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप ही आहेत. मात्र, एका नव्या अभ्यासात दावा करण्यात आला आहे, की या सर्वांच्या आधी कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये न्युरोलॉजिकल लक्षणं दिसू लागतात. हा अभ्यास अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिननं केला आहे. रुग्णांच्या न्युरोलॉजिकल लक्षणांवर करण्यात आलेला हा अभ्यास एनल्स ऑफ न्युरोलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी अर्ध्या रुग्णांमध्ये कोरोनाची न्युरोलॉजिकल लक्षणं दिसून आली. यात डोकेदुखी, चक्कर येणे, असजगता, लक्ष केंद्रित करण्यात समस्या, गंध आणि चवीची जाणीव न होणे, झटके, स्ट्रोक, अशक्तपणा आणि स्नायूंचे दुखणे यांचा समावेश आहे.

अभ्यासाचे मुख्य लेखक आणि न्युरो-संक्रमक रोगांचे नॉर्थवेस्टर्न मेडिसिन चीफ डॉक्टर इगोर कोरालनिक म्हणाले, 'सामान्य नागरिक आणि डॉक्टरांना यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. कारण कोरोना व्हायरस इंफेक्शन ताप, कफ आणि श्वासाच्या समस्येपूर्वीच शरीरारात न्युरोलॉजिकल लक्षणांसोबत राहू शकतो.'

कोरोना व्हायरस मेंदू, पाठीचे हाड, नसा आणि स्नायूंसह संपूर्ण नर्व्हस सिस्टमलाच प्रभावित करू शकतो. डॉक्टर कोरालनिक यांचे म्हणणे आहे, की COVIDचे अनेक वेगवेगळे प्रकार न्युरोलॉजिकल डिसफंक्शनचे कारण ठरू शकतात.

हा आजार विशेषतः फुफ्फुस, किडनी आणि हृदयावर अधिक प्रभाव टाकतो. मात्र, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे याचा परिणाम मेंदूवरही होऊ शकतो, असेही कोरालनिक म्हणतात.

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे क्लॉटिंग डिसऑर्डरदेखील होऊ शकते. यामुळे रुग्णांना इस्केमिक अथवा हॅमरेजिक स्ट्रोकदेखील होऊ शकतो.

हा व्हायरस मेंदू आणि मस्तिष्कावरणात प्रत्यक्ष संक्रमणाचे कारण होऊ शकतो. याशिवाय हा व्हायरस रोगप्रतिकार प्रणालीमध्ये सूज निर्माण करू शकतो. यामुळे मेंदू आणि नसा खराब होऊ शकतात.

डॉक्टर कोरालनिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक न्युरो-कोविड रिसर्च टीम तयार केली आहे आणि रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व कोरोना रुग्णांचा गहण अभ्यास सुरू केला आहे. न्युरोलॉजिकल समस्यांचे प्रकार आणि त्यांच्या उपचारांवर काम केले जावे, हा यामागचा उद्देश आहे.