आनंदाची बातमी : 'उवा' मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधाने काही तासांतच केला कोरोनाचा 'खात्मा'!; क्लिनिकल ट्रायल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 04:09 PM2020-05-14T16:09:45+5:302020-05-14T16:32:41+5:30

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत घेतले आहे. कोरोनाचा खात्मा करण्यासाठी जगभरात वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आता, अमेरिकेत डोक्यातील उवा मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या क्लिनिकल ट्रालयला सुरुवात करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसांपासून काही डॉक्टर या औषधाचा उल्लेख करत होते आणि या औषधाने कोरोनाचा इलाज शक्य आहे, असेह म्हणत होते.

अमेरिकेपूर्वी, बगदाद युनिवर्सिटीमध्ये या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात झाली आहे. तेथे 5 मेरोजी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात करण्यात आली.

या औषधाचे नाव आहे, आयवरमेक्टिन (Ivermectin). गेल्या महिन्यात हे औषध प्रयोगशाळेत यशस्वी झाल्याचे अमेरिकन वैज्ञानिकांना दिसून आले. याचाच अर्थ लॅबमध्ये या औषधाने कोरोना व्हायरसचा खात्मा केला. आता, याचे क्लिनिकल ट्रायल सुरू झाले आहे.

या औषधासोबतच अॅझिथ्रोमाइसिन आणि कॅमोस्टेट मिसायलेटचीही ट्रायल होणार आहे. यानंतर सर्व औषधांचे वेगवेगळे आणि कॉम्बिनेशनच्या स्वरुपात ट्रायल केले जाईल. ज्याच सर्वोत्तम रिझल्ट येईल ते पुढे कंटिन्यू केले जाईल, असे अमेरिकन डॉक्टरांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील केंटकी यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनच्या सायंटिस्ट आणि या ट्रायलचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. सुसैन ऑर्नाल्ड यांनी म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा खात्मा करेल, असे कोणतेही औषध अद्याप तयार झालेले नाही. ना त्यावर व्हॅक्सीन उपलब्ध झाली आहे. यामुळे या तिन्ही औषधांचे कॉम्बिनेशन आणि एकएकट्याचा काय परिणाम होतो, हे पाहण्याची आमची इच्छा आहे.

यापूर्वी 5 मेरोजी इराकमधील बगदाद युनिव्हर्सिटीनेही आयवरमेक्टीन औषधाच्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात केली आहे. येथे आयवरमेक्टीन 0.2ने जवळपास 50 रुग्णांवर प्रयोग सुरू आहे. हे ट्रायल ऑगस्टपर्यंत सुरू राहील.

ऑस्ट्रेलियामध्ये रॉयल मेलबर्न हॉस्पीटल आणि व्हिक्टोरियन इंफेक्शियस डिसीज रेफरन्स लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांनी आयवरमेक्टीनवर अभ्यास केला होता. हा अभ्यास गेल्या महिन्यातच करण्यात आला. यात, कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यात हे औषध सक्षम असल्याचे म्हणण्यात आले आहे.

आयवरमेक्टीन औषधाने केवळ 48 तासांत कोरोना व्हायरसचा खात्मा होतो, असे या ऑस्ट्रेलियन अभ्यासात स्पष्टपणे म्हणण्यात आले होते. वैज्ञानिकांनी लॅबमध्ये कोरोना व्हायरसवर हे औषध टाकले. यानंतर आश्चर्य कारक परिणाम समोर आले आहेत.

लॅबमध्ये हे दिसून आले आहे, की पहिल्या 24 तासांत व्हायरसची संख्या घटते. तर पुढील 24 तासांत हे औषध कोरोना व्हायरसचा पूर्णपणे खात्मा करते. हेच अमेरिकेच्या लॅबमध्येही सिद्ध झाले आहे. आता केवळ क्लिनिकल ट्रायलनंतर काय परिणाम येतात हे पाहणे, आवश्यक आहे.

अमेरिकेत आयवरमेक्टीन औषधाच्या क्लिनिकल ट्रायलसाठी 240 जणांनी आपले नाव नोंदवले आहे. या औषधाच्या ट्रायलचा रिझल्ट मे 2021पर्यंत येऊ शकतो. असेही सांगण्यात येत आहे.