CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा विस्फोट; ICU मध्ये दररोज 100 हून अधिक रुग्ण होताहेत भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 07:53 PM2021-11-30T19:53:37+5:302021-11-30T20:10:40+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: ओमायक्रॉन या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.

संपूर्ण जग कोरोनाचा महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 26 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 262,595,899 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 5,228,534 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान लाखो लोकांनी कोरोनावर मात केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. जगभरात उपचारानंतर 237,158,776 जण कोरोनातून बरे झाले आहेत.

कोरोनाचा वेग सध्या मंदावत असला तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही भीषण परिस्थिती आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका निर्माण झाला असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ओमायक्रॉन या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये 50 स्पाइक म्युटेशन आढळून आल्याने तो अत्यंत घातक असल्याचं सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा परिणाम फ्रान्समध्येही स्पष्टपणे दिसून येत आहे. फ्रान्सच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनाच्या नवीन प्रकरणांमुळे रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही आता झपाट्याने वाढत आहे.

आकडेवारीनुसार, मार्च-एप्रिलनंतर गंभीर कोरोना रुग्णांची संख्या 117 वरून 1749 वर पोहोचली आहे. कोरोना संसर्गाचा फटका बसल्यानंतर आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज 100 हून अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

फ्रान्समधील रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 470 वरून 9,860 पर्यंत वाढली आहे, जी 29 मार्चपासूनची सर्वात मोठी एक दिवसीय संख्या आहे. आठवडाभरापूर्वीच्या तुलनेत, कोविड-19 रुग्णांच्या संख्येत 18% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिवियर वेरन यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की फ्रान्स कोरोना व्हायरस साथीच्या रोगाच्या पाचव्या लाटेच्या सुरुवातीस आहे. आरोग्य मंत्री वेरन म्हणाले होते, अनेक शेजारी देश आधीच कोविड-19 महामारीच्या पाचव्या लाटेत आहेत.ज्याचा आपण फ्रान्समध्ये अनुभव घेत आहोत.

आधीच्या लाटेच्या तुलनेत ही लाट अधिक खतरनाक आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीचं अत्यंत काटेकोरपणे पालन करा असं आवाहन ओलिवियर वेरन यांनी केलं आहे. जास्तीत जास्त लसीकरण आणि स्वच्छतेने आपण धोका कमी करू शकतो, त्याला हरवू शकतो असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या महाभयंकर संकटाला हलक्यात घेणं आता जीवघेणं ठरू शकतं. तब्बल 53 देशांमध्ये नव्या लाटेचा धोका निर्माण झाला असून WHO ने याबाबत गंभीर इशारा दिला आहे. लसीकरणानंतरही युरोप कोरोना महामारीचं केंद्र झालं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच काही देशांनी टेन्शन वाढवलं आहे. 53 देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या आणखी एका लाटेचा धोका आहे किंवा यातील बरेच देश आधीच महामारीच्या नवीन लाटेचा सामना करत आहेत.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने टेन्शन वाढवलं असतानाच धक्कादायक माहिती समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील ओमायक्रॉनचा जगाला मोठा धोका असून याचे गंभीर परिणाम असू शकतात असं म्हटलं आहे. याच दरम्यान दुसरीकडे नवा व्हेरिएंट हा वेगाने पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या ज्या प्रांतात ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम आढळून आला होता, त्या भागातील रुग्णालयांत रुग्णसंख्येत तब्बल 330 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आता समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गाँटेग प्रांतात पहिल्यांदा ओमायक्रॉन आढळून आला होता. त्यानंतर हा प्रांत दक्षिण आफ्रिकेतील नवा 'वुहान' ठरला होता.

गाँटेक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात नव्यानं दाखल होणारी कोरोना रुग्णाची संख्या 580 वर पोहचली आहे. दोन आठवड्यांच्या रुग्णसंख्येवर नजर टाकली असता ही तब्बल 330 टक्के वाढ असल्याचं दिसून येत आहे.