CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! 'या' देशात मृतदेह दफन करण्यासाठी जागाच नाही; कबरींतून उकरून काढावे लागले सांगाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 12:27 PM2021-04-03T12:27:47+5:302021-04-03T12:55:51+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 13 कोटींचा टप्पा आता पार केला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही देशांमध्ये अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंतेत भर पडली असून कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ आता समोर आला आहे.

कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. तसेच काही ठिकाणी वेगाने लसीकरणा मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे.

अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश होतो. सध्या ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. सर्वात मोठं शहर असलेल्या असलेल्या साओ पाउलोमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह दफन करण्यासाठी कब्रिस्तानमध्ये आता जागाच शिल्लक राहिलेली नाही.

कोरोनामुळे भयावह परिस्थिती असून कर्मचाऱ्यांकडून जुने सांगाडे बाहेर काढण्यात येत आहेत आणि त्याठिकाणी नवीन मृतदेहांसाठी जागा तयार केली जात आहे. गेल्या एका आठवड्यात ब्राझीलमध्ये जवळपास 60 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनामुळे झालेल्या मृतांचे अंत्यविधी करण्यासाठी कबरीतून सांगाडे उकरून काढावे लागत आहेत. एका ठिकाणी जवळपास हजारो सांगाडे बाहेर काढून मृतदेहांसाठी जागा तयार करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी दफन केलेल्या कबरींवरील वरील भाग काढण्यात येत असून तेथील सांगाडे काढण्यात येत आहे. साओ पालोमधील ब्राझीलमधील सर्वात मोठ्या कब्रस्तानापैकी एक असलेल्या विला फोरमोसा सिमेट्रीमध्ये कर्मचारी मास्क, पीपीई किट घालून दिवस-रात्र कबर खोदत आहेत.

ब्राझीलमधील या सर्वात मोठ्या शहरात अनेक कबरी खोदण्यात आल्या. मृतदेहांसाठी जागा अपुरी पडत होती. कोरोनामुळे मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने कबरी खोदण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 24 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले असून 3 लाख 10 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता ब्राझीलमध्ये सापडत आहेत. तर सर्वाधिक मृत्यू देखील याच देशात होत आहेत.

देशातील अनेक रुग्णालयांची क्षमता देखील संपुष्टात आली आहे. देशातील 26 पैकी 16 राज्यांमध्ये आयसीयू बेड्सची कमतरता निर्माण झाली आहे. 90 टक्के आयसीयू बेड्स रुग्णांनी व्यापले आहेत.

रिओ ग्रँड डो सुल येथे तर आयसीयू केअर युनिटमध्ये दाखल होण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांत वेटिंग लिस्ट तब्बल दुपटीनं वाढली आहे. बेड्सच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना चक्क खुर्च्यांवर बसून उपचार घ्यावे लागत आहेत.

कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री एर्नेस्टो अरेजो यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती जेर बोल्सनारो यांच्याकडे सोपवला आहे.

ब्राझीलसाठी जगभरातून आवश्यक त्याप्रमाणात कोरोना लस न मिळवणे हा एक कूटनितीक पराभव असल्याचं समजलं गेलं आहे. त्यामुळेच परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

ब्राझीलसारखा देश लसीसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामुळेच इतर देशांसोबत असलेले संबंध वापरले जात आहेत. मात्र परराष्ट्रमंत्री अर्नेस्टो अरेझो अपयशी ठरले. त्यामुळेच ब्राझीलला आवश्यक त्या प्रमाणात लस मिळू शकली नाही.

प्रगत देशही हतबल झाले आहेत. कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे. फ्रान्समध्ये तिसरी लाट आली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने रौद्ररुप धारण केलं असून पुन्हा एकदा तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे

फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण देशात चार आठवड्यांचा लॉकडाऊन असल्याचं म्हटलं आहे.

देशव्यापी लॉकडाऊनचा आदेश देतानाच इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये शाळा तीन आठवड्यांसाठी बंद असतील अशी माहिती दिली आहे. जर आपण आता कठोर पाऊल उचललं नाही तर नियंत्रण गमावू अशी भीती मॅक्रॉन यांनी देशवासियांना संबोधित करताना व्यक्त केली.

लॉकडाऊन दरम्यान फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरू करण्याची परवानगी आहे. तसेच ऑफिसमध्ये जाण्याऐवजी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. तसेच 10 किमीहून अधिक अंतरावर जाण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.

फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी लॉकडाऊनमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग अधिक वाढवला जाईल असं म्हटलं आहे. तसेच 18 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोना लस देण्यात येणार असल्याचं देखील म्हटलं आहे.

Read in English