Coronavirus: पहिला कोरोना संशयित आढळल्यानं उत्तर कोरियात आणीबाणीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 12:51 PM2020-07-26T12:51:36+5:302020-07-26T12:56:38+5:30

जगभरात कोरोनाचा कहर सुरुच आहे, दरम्यान, उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळून आला आहे. देशात कोरोनाचं असे पहिले प्रकरण समोर येताच उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याने आणीबाणी जाहीर केली आहे.

कोविड संशयिताने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून दक्षिण कोरियाहून उत्तर कोरियात प्रवेश केला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांनी आपत्कालीन पॉलिटब्यूरो बैठक बोलावली आणि आणीबाणीची घोषणा केली.

अहवालानुसार, जर या प्रकरणाची पुष्टी झाली तर उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे स्वीकारल्या गेलेल्या कोरोना व्हायरसचा हा पहिला रुग्ण असेल.

उत्तर कोरियाच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) वृत्त दिले की, तीन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाला गेलेली एक व्यक्ती या महिन्यात सीमेवरुन परत आली आहे. या व्यक्तीत कोविड -१९ ची लक्षणेही सापडली आहेत.

दरम्यान, केसीएनएने त्या व्यक्तीची कोरोना तपासणी झाली आहे की नाही हे सांगितले नाही, परंतु त्या व्यक्तीला श्वासोच्छवास घेण्यास अडचण आणि रक्तस्त्राव होत असल्याचं सांगितले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तो सध्या देखरेखीखाली आहे.

उत्तर कोरियाच्या क्युनगी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी सांगितले की आणीबाणीची घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे, फक्त उत्तर कोरिया पहिल्यांदाच कोरोनो विषाणूच्या संशयित सापडला इतकेच नाही तर त्यातून मदतीचं आवाहनही आहे.

उत्तर कोरियाने सुरुवातीच्या काळात आपल्या देशाच्या सर्व सीमा सील केल्या होत्या. याशिवाय त्यांनी परदेशी पर्यटकांच्या येण्यावर बंदी घातली होती. एप्रिल-मेमध्ये हजारो लोकांना संशयाच्या आधारावर क्वारंटाईन केले होते.

अण्वस्त्र कार्यक्रमासंदर्भात आंतरराष्ट्रीय बंदीमुळे उत्तर कोरियावर प्रचंड आर्थिक दबाव आहे हेही एक वास्तव आहे. आणि दरम्यानच्या काळात कोरोना प्रकरण समोर आल्यानंतर आर्थिक दबाव आणखी वाढला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने उत्तर कोरियाला मदत केली आहे. टीबीचे औषध म्हणून उत्तर कोरियाला १० लाख डॉलर्स वैद्यकीय मदत पाठविण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या विनंतीनंतर भारताने ही मदत केली आहे.

शुक्रवारी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयाने नमूद केले आहे की, उत्तर कोरियामध्ये वैद्यकीय पुरवठा व परिस्थितीच्या तुटवड्याबाबत भारत संवेदनशील आहे आणि टीबीचे औषध म्हणून दहा लाख डॉलर्सची मानवी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.