coronavirus: धक्कादायक, माणसांमधून प्राण्यांमध्ये पसरला कोरोना, अमेरिकेत १० हजार पाणमांजरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 06:20 PM2020-10-11T18:20:53+5:302020-10-11T18:51:44+5:30

coronavirus News : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आतापर्यंत जगभरात कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्या झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या फैलावाबाबत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण जगभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आतापर्यंत जगभरात कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्या झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या फैलावाबाबत अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमेरिकेमध्ये माणसाच्या माध्यमातून प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेतील एका फर फार्म्सवर सुमारे दहा हजार पाणमांजरे मृतावस्थेत आढळली. या घटनेनंतर कोरोना विषाणूचा माणसांमधून प्राण्यांमध्ये फैलाव झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ही पाणमांजरे उटाह आणि विसकॉन्सिनमधील फर फार्म्समध्ये मृतावस्थेत सापडली आहेत.

सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार एकट्या उटाहमध्ये सुमारे आठ हजार पाणमांजरांचा मृत्यू झाला आहे. उटाहमधील एका पशुतज्ज्ञाने सांगितले की, पाणमांजरांमध्ये हा विषाणू सर्वप्रथम ऑगस्ट महिन्यात दिसून आला होता. त्यापूर्वी जुलै महिन्यामध्ये येथील काही कामगार आजारी पडले होते.

कोरोना विषाणू हा माणसांमधून प्राण्यांमध्ये पसरला होता, असे सुरुवातीच्या संशोधनामधून समोर आले आहे. मात्र तज्ज्ञानी अशा कुठल्याही प्रकाराला दुजोरा दिलेला नाही. याबाबत डॉक्टक डीन टेलर सांगतात की, उटाहमध्ये आम्ही जे काही पाहिले, त्यामधून असे दिसून येते की, हा विषाणू माणसामधून प्राण्यांमध्ये फैलावला आहे. हा प्रकार युनिडायरेक्शनल पाथप्रमाणे आहे. याबाबत सध्यातरी संशोधन सुरू आहे.

ही समस्या केवळ उटाहपर्यंतच मर्यादित नाही आहे. विस्कॉन्सिनमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे सुमारे दोन हजार पाणमांजरांचा मृत्यू झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून स्थानिक प्रशासनाने फर फार्म अनिश्चित काळासाठी क्वारेंटाईन केले आहे. यापूर्वी नेदरलँड्स, स्पेन आणि डेन्मार्कमध्येसुद्धा असे प्रकार समोर आले होते.

यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रिकल्चरच्या नॅशनल वेटरनरी सर्विस लेबॉरेटरीजनेसुद्धा डझनभर प्राण्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला होता. सीएनएनच्या रिपोर्टनुसार यामध्ये कुत्रे, मांजरे, सिंह आणि वाघ यासारख्या प्राण्यांचा असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाणमांजरांमध्ये माणसांप्रमाणेच लक्षणे दिसत होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा विषाणू प्राण्यांमध्ये वेगाने पसरला. तसेच दुसऱ्याच दिवशी संसर्ग झालेल्या बहुतांश पाणमांजरांचा मृत्यू झाला.

उटाहमध्ये आतापर्यंत एकूण नऊ फार्म्सवर पाणमांजराचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या आपण कोरोनाच्या मधल्या टप्प्यावर आहोत. या वर्षी जुलै महिन्यात नेदरलँड्समध्ये सुमारे १० हजार मादी पाणमांजरे आणि सुमारे ५० हजार लहान पाणमांजरांना जनावरांमधून माणसात कोरोनाचा फैलाव होण्याच्या भीतीने ठार मारण्यात आले होते.

काही पाणमांजरे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले होते. जनावरांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचा पहिला प्रकार एप्रिलमध्ये समोर आला होता. तर मे महिन्यात पाणमांजरापासून माणसांना कोरोना झाल्याच्या दोन घटना समोर आल्याचे नेदरलँड्स सरकारने सांगितले. चीनमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्यापासून हा एकमेव प्रकार होता ज्यामध्ये प्राण्याने माणसाला संक्रमित केले होते.