CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! कोरोनामुळे 'हा' देश हतबल; रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता, संसर्गाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:57 PM2021-11-12T15:57:33+5:302021-11-12T16:12:53+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 25 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांची संख्या 252,703,998 वर पोहाचली असून 5,096,882 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

कोरोना संसर्गामुळे रशियातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता पाहायला मिळत आहे. रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 12 रुग्णालयांमध्ये फक्त दोन दिवसांचा ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे.

जर्मनीमध्ये कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या नोंदवली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा युरोपमध्ये महामारीच्या धोक्याचा इशारा दिला आहे. ज्या आरोग्य कर्मचार्‍यांना लसीकरण केले गेले नाही त्यांना पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लसीकरण करणे आवश्यक आहे असं ब्रिटनने म्हटलं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियामधील कामावरील नऊ दिवसांची बंदी देशाच्या बहुतांश भागात संपल्यानंतर आताही मंगळवारी कोरोनामुळे विक्रमी मृत्यूची नोंद झालेली आहे.

रशियामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 38058 नवे रुग्ण आढळून आले आबेत. तर या कालावधीत 1239 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रशियामध्ये कोरोना बाधितांची संख्या 8,911,713 वर गेली आहे, तर महामारीमुळे 250,454 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

रशिया हा युरोपमधील साथीच्या रोगाने सर्वाधिक प्रभावित झालेला देश आहे. फक्त मॉस्कोमध्ये संसर्गाची 3,927 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात देशात दररोज सुमारे 40 हजार नवीन रुग्ण येत आहेत, तर दररोज 1,100 हून अधिक लोकांचा संसर्गामुळे मृत्यू होत आहे.

गेल्या महिन्यात राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रशियन नागरिकांना 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत काम थांबवण्यास सांगितले होते. काही रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांसाठी अतिरिक्त व्यवस्था करावी लागत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) युरोपमध्ये महामारीमुळे मृत्यू होण्याच्या संख्येत 10 टक्के वाढ झाली आहे असं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओचे युरोपीयन क्षेत्राचे संचालक हंस क्लुज यांनी गेल्या आठवड्यात युरोप महामारीच्या केंद्रस्थानी परतला आहे असं सांगितलं.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतेही उपाय न केल्यास फेब्रुवारीपर्यंत या भागात आणखी 500,000 मृत्यू होऊ शकतात. डब्ल्यूएचओने युरोप हा जगातील एक असा प्रदेश बनला आहे जिथे संक्रमित आणि मृतांची संख्या सतत वाढत आहे असं म्हटलं आहे.

कोरोनाचा वेग सध्या मंदावत असला तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही भीषण परिस्थिती आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

फ्रान्समध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात कोरोनाच्या पाचव्या लाट आली असून गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिवियर वेरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये कोरोनाच्या पाचव्या लाटेला सुरुवात झाली आहे. आपल्या शेजारी देशांमध्ये ही लाट आली आहे. त्यांचा डेटा पाहिला असता आधीपेक्षा यावेळी भयंकर स्थिती निर्माण होऊ शकते.

आधीच्या लाटेच्या तुलनेत ही लाट अधिक खतरनाक आहे. त्यामुळे कोरोना नियमावलीचं अत्यंत काटेकोरपणे पालन करा असं आवाहन ओलिवियर वेरन यांनी केलं आहे. जास्तीत जास्त लसीकरण आणि स्वच्छतेने आपण धोका कमी करू शकतो, त्याला हरवू शकतो असं देखील म्हटलं आहे.

फ्रान्समध्ये आतापर्यंत 73.46 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे 1.19 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सातत्याने मोठी वाढ होत आहे. फेब्रुवारीत कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला होता.