CoronaVirus News : बापरे! विमानतळावरील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, तब्बल 8000 जणांची केली चाचणी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 10:42 AM2020-11-11T10:42:45+5:302020-11-11T11:05:53+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल पाच कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जगभरात कोरोनावर युद्धपातळीवर संशोधन सुरू असून चाचण्यांना यश येत आहे.

चीनमधील विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासनाने तातडीने जवळपास आठ हजार जणांची कोरोना चाचणी केली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे कर्मचाऱ्याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनचे आर्थिक केंद्र असलेल्या शांघाईमधील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळपास 186 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. तर आठ हजारांहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

विमानतळावरील कर्मचाऱ्याशिवाय इतर कोणीही कोरोनाबाधित आढळलं नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. चीनमधील तियानजीन शहरात स्थानिक पातळीवर एक रुग्ण आढल्यानंतर 77 हजारांहून अधिक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य प्रशासनाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून चीनमध्ये आलेल्या 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 426 जणांवर उपचार सुरू आहेत.

चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 86,267 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये तब्बल 50 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत.

पुन्हा एकदा या संपूर्ण भागामध्ये लॉकडाऊन लागू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहे.

कोरोनाचा एक रुग्ण आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कोरोना चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून 137 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.

कोरोनाला रोखल्यानंतर आता पुन्हा शिनजियांगजवळच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. म्हणूनच नागरिकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.