लडाख सीमेजवळ चीन-पाकिस्तानी लढाऊ विमानांची बॉम्बफेक; युद्धाभ्यासामुळे भारताचे टेन्शन वाढले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 12:57 PM2021-06-11T12:57:33+5:302021-06-11T13:01:56+5:30

China-Pakistan fighter jets: दोन आठवड्यांपूर्वी चीन सीमेवर लढाऊ विमानांचा ताफा मोठ्या प्रमाणावर तैनात करू लागला होता. यामुळे लष्करप्रमुखांनी लडाखमध्ये भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता.

पाकिस्तानी हवाई दल (Pakistan fighter jets) चीनसोबत (China) मिळून तिबेटमध्ये लडाखच्या सीमेजवळ युद्धाभ्यास करत आहे. आधीपासून वादाचे क्षेत्र असलेल्या या भागात दोन दुष्मन देश बॉम्बफेक करत असल्याने भारताचे टेन्शन वाढले आहे. यामुळे भारताला या युद्धाभ्यासावर करडी नजर ठेवावी लागत आहे. (China-Pakistan fighter jets raining bombs near Ladakh)

महत्वाचे म्हणजे या युद्धाभ्यासामध्ये चिनी हवाई दलाच्या लढाऊ विमानांसोबत पाकिस्तानी लढाऊ विमानेदेखील आहेत. तिबेटमध्ये दोन्ही देशांचे सैन्य एकत्र आल्याने भारतीय सैन्याने सीमेवर सतर्कता वाढविली आहे. भारतीय रडार, लढाऊ विमाने आणि अवाक्स चोविस तास सीमेवर पहारा देत आहेत. (Pakistani Air Force is conducting joint exercises with China in Tibet)

दोन आठवड्यांपूर्वी चीन सीमेवर लढाऊ विमानांचा ताफा मोठ्या प्रमाणावर तैनात करू लागला होता. यामुळे लष्करप्रमुखांनी लडाखमध्ये भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला होता.

चीन आणि पाकिस्तानी विमाने हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि हवेतून पाण्यात मिसाईल डागण्याचे आणि लक्ष्य उडविण्याचा अभ्यास करत आहेत. सर्वसाधारणपणे कोणताही देश वादग्रस्त ठिकाणी युद्धाभ्यासाला जात नाही. परंतू पाकिस्तान गेल्याने दुसऱ्या सीमेवरही धोक्याची घंटा वाजू लागली आहे. भारतीय हवाई हद्दीच्या खूपच जवळून ही विमाने उडत आहेत.

दोन्ही देशांनी तिबेटला युद्धाभ्यासासाठी निवडल्याने नवे प्रश्न उभे राहिले आहेत. कारण तिबेट सामरिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे. चीनने बळजबरीने या भागावर कब्जा मिळविलेला आहे. गेल्या वर्षी याच भागावरून वाद झाला होता. यामुळे मुद्दामहून चीन आणि पाकिस्तानने भारताला खिजविण्यासाठी हे क्षेत्र निवडले आहे.

पाकिस्तान चीनच्या मदतीशिवाय भारताशी लढाई लढू शकत नाहीय. तसेच चीनही पाकिस्तानशिवाय भारताला जास्त दबावात ठेवू शकत नाही. यामुळेच चीनने युद्धाभ्यासासाठी पाकिस्तानला सोबत घेतल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने देखील अनेकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैन्याला बोलावले आहे.

तिबेटमध्ये नुकतीच उष्णता सुरु झाली आहे. यामुळे आधी भयानक थंडीमध्ये दिवस काढलेल्या चिनी सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी युद्धाभ्यास सुरु केला आहे. 22 मे पासून सुरु झालेला हा युद्धाभ्यास जूनच्या अखेरीस संपणार आहे. या काळात चिनी ड्रोन आणि लढाऊ विमानांवरून मिसाईल फायर केले जाणार आहेत.

2019 मध्येही दोन्ही देशांचे हवाई दलांनी युद्धाभ्यास केला होता .तेव्हा पाकिस्तानच्या जे -17 आणि चीनच्या जे-10 लढाऊ विमानांनी सहभाग घेतला होता.

चीन आणि पाकिस्तानच्या या युद्धाभ्यासात भारताचे सुखोई एसयू-30 एमकेआय़ विमान पाडण्याचा सराव करण्यात आला आहे. एकट्याने राफेल आणि सुखोईचा सामना करण्याची ताकद दोन्ही देशांकडे नाहीय. यामुळे दोन्ही देशांनी जे-10 आणि जे 11 लढाऊ विमानांद्वारे सुखोईला घेरून पाडण्याचा सराव करण्यात आला.

पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाभ्यासावेळी भारताचे राफेल आणि सुखोई पाडण्यासाठी चीनच्या J-10C आणि J-11B फायटर जेटचा वापर करण्यात आला.