11 वर्षांनी पुन्हा येणार, २०७९ वर्ष धोक्याचे; पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:24 PM2020-04-29T18:24:14+5:302020-04-29T18:33:02+5:30

वैज्ञानिकांनी या मोठ्या उल्कापिंडाचे तब्बल १७७ वर्षांचे कॅलेंडर बनविले आहे. यामुळे त्याच्या मार्गक्रमणाबाबत अचूक माहिती मिळणार आहे.

अंतराळातून रॉकेटच्या तिप्पट वेगाने जाणारा एक मोठा उल्कापिंड 1998 OR2 पृथ्वीच्या जवळून गेला आहे. या उल्कापिंडमुळे पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. कारण हा उल्कापिंड ६३ लाख किमीवरून पुढे गेला आहे. तो याआधी १२ मार्च २००९ मध्ये पृथ्वीपासून २.६८ कोटी किमी लांबीवरून गेला होता. आता घाबरायचे कारण नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

हा उल्कापिंड पृथ्वीच्या शेजारून यापुढेही जाणार असून त्याचा वेग पाहता तो ११ वर्षांनी पुन्हा येणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे पृथ्वीपासून १.९० कोटी किमी असणार आहे. हा उल्कापिंड दर ११ वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. भविष्यात हा उल्कापिंड २०३१, २०४२ आणि नंतर २०६८ व २०७९ मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.

यापैकी २०७९ मध्ये हा उल्कापिंड पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे आतापेक्षा ३.५ पटींनी कमी असणार आहे. आज हा उल्कापिंड ६३ लाख किमी लांबून गेला आहे. २०७९ मध्ये हा उल्कापिंड १७.७३ लाख किमी अंतरावरून जाणार आहे. हे या उल्कापिंडाचे पृथ्वीपासूनचे सर्वांत कमी अंतर असणार आहे.

वैज्ञानिकांनी या मोठ्या उल्कापिंडाचे तब्बल १७७ वर्षांचे कॅलेंडर बनविले आहे. यामुळे त्याच्या मार्गक्रमणाबाबत अचूक माहिती मिळणार आहे. हा एक लघुग्रहच असून २१२७ मध्ये पृथ्वीच्या २५.११ लाख किमी अंतरावरून जाणार आहे. वैज्ञानिकांनी या ग्रहाला धोक्याच्या श्रेणीमध्ये ठेवले आहे.

जर २०७९ आणि २१२७ वेळेला कोणताही धोका निर्माण झाला नाही तर पुढे या उल्कापिंडापासून पृथ्वीला कोणताही धोका राहणार नाही. जरी आज हा उल्कापिंड ६३ लाख किमीवरून गेला असला तरीही हे अंतर अंतराळ विज्ञानामध्ये खूप जास्त मानले जात नाही.

एस्टेरॉयड 1998 OR2 चा व्यास हा ४ किमींचा आहे. याचा वेगही 31,319 किमी प्रतितास आहे. म्हणजेच ८.७२ किमी प्रति सेकंद. रॉकेटपेक्षा तिप्पटीने याचा वेग आहे.

हा उल्कापिंड सुर्याला फेरा मारण्यासाठी १३४० दिवस घेतो. यापुढील पृथ्वीजवळील त्याची भ्रमंती १८ मे 2031 होण्याची शक्यता आहे.

खगोल शास्त्रज्ञांनुसार अशा उल्कापिंडाची दर १०० वर्षाला पृथ्वीवर आदळण्याची वारंवारता ५०००० पटींनी जास्त असते. मात्र, हे उल्कापिंड कोणत्या ना कोणत्या प्रकारे पृथ्वीच्या बाजुने निघून जातात.

आंतरराष्ट्रीय समुहाचे डॉ ब्रूस बेट्स यांनी सांगितले की, अशा प्रकारचे लघू ग्रह म्हणजे उल्काच असतात. या काही मीटर ते किमी मोठ्या असतात. या उल्का पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच जळून राख होऊन जातात. यामुळे अद्याप मोठे नुकसान झालेले नाही.

२०१३ मध्ये जवळपास २० मीटर लांबीचा उल्कापिंड वायुमंडळाला आदळला होता. तर १९०८ मध्ये चाळीस मीटर लांबीची उल्का सायबेरियावरील वायुमंडळाला आदळून जळाला होता.

नासाकडून अद्याप अधिकृत माहिती आली नसून दक्षिण आफ्रिकेच्या अंतराळ संस्थेने याची पुष्टी केली आहे.