मुलीच्या अचानक जाण्यानं बाप खचला, पण तिच्याच नावानं अख्खा मार्केट गाजवला; ‘निरमा’गर्ल आहे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 03:48 PM2021-07-22T15:48:49+5:302021-07-22T15:56:10+5:30

Success Story behind of Nirma Washing Powder Product: १९९० च्या दशकात अनेकांच्या तोंडावर एक जिंगल कायम असायची ती म्हणजे 'हेमा, रेखा, जया और सुष्मा...सबकी पसंद निरमा'..या निरमा उत्पादनामागे रंजक अशी कहानी आहे.

१९९० च्या दशकात अख्ख्या मार्केटमध्ये निरमा वॉशिंग पावडरची जिंगल भारतीय टीव्ही जगतात खूप प्रसिद्ध झाली होती. या जिंगलच्या आधारे निरमाच्या वॉशिंग पावडरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. लहान मुलांपासून वयस्कांपर्यत प्रत्येकांच्या तोंडावर ‘सबकी पसंद निरमा’ हे नावं होतं.

‘निरमा’ वॉशिंग पावडरच्या पॅकेटवर एक मुलगी सफेद फ्रॉक घालून दिसून येते. टीव्ही जाहिरातीत अनेक चेहरे बदलले परंतु पॅकेटवरील लहान मुलीचा फोटो आजही तसाच आहे. त्यामुळे ही निरमा गर्ल आहे तरी कोण? काय आहे या यशस्वी उद्योगामागची कहानी? जाणून घेऊया

१३ एप्रिल १९४४ मध्ये गुजरातच्या मेहसाणा शहरात एका शेतकरी कुटुंबात करसनभाई पटेल यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती हालाखीची असताना करसनभाईंनी चांगले शिक्षण घेऊन सरकारी नोकरीत रुजू झाले. सर्वसामान्यांप्रमाणे करसनभाई जीवन जगत होते.

सरकारी नोकरी आणि कुटुंब हे आयुष्य चांगलं चाललं होतं. परंतु काहीतरी स्वत:चं करण्याची इच्छा मनात होती. मात्र इच्छा मारून ते नोकरी करत राहिले. करसनभाई त्यांच्या मुलीवर खूप प्रेम करायचे. त्यांची इच्छा होती आपल्या मुलीनं शिक्षण घेऊन असं काही तरी करावं ज्यानं संपूर्ण देशात तिचं नाव होईल.

परंतु हे शक्य झालं असतं जर त्यांची मुलगी जिवंत असती तर..मुलगी शाळेत शिकत असताना एका अपघातात तिचा मृत्यू झाला. मुलीच्या अचानक जाण्यानं करसनभाई बाप म्हणून पुरता खचला. मुलीच्या जाण्यानं करसनभाईंना प्रचंड दु:खं झालं होतं. पण आयुष्यातील याच घटनेने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदललं.

एकेदिवशी करसनभाईंच्या मनात विचार आला. असं काही तरी करावं ज्यामुळे त्यांची मुलगी पुन्हा येईल आणि बापाचं अर्धवट स्वप्न पूर्ण करेल. त्यानंतर करसनभाईंनी वॉशिंग पावडर बनवण्याचा निर्णय घेतला. करसनभाईंच्या मुलीचं नाव निरुपमा होतं.

निरुपमाला लाडाने सर्वजण निरमा बोलायचे. याच विचाराने करसन पटेल यांनी त्यांच्या वॉशिंग प्रोडक्टचं नाव निरमा असं ठेवलं. ज्यामुळे निरमा संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली. १९६९ मध्ये करसन पटेल यांनी निरमा पावडर बनवण्याची सुरूवात त्यांच्या घरातून केली.

विज्ञानातून पदवीधर असल्याने त्यांना पावडर बनवण्यासाठी विशेष मेहनतीची गरज भासली नाही. हा काळ भारतातील लोकांकडे वॉशिंग पावडरसाठी कोणतेही पर्याय नव्हते. हिंदुस्तान लीवर अथवा परदेशी कंपन्या सर्फ विकत होते.

सर्फचे दर मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना परवडत नव्हते. करसनभाईंनी लोकांची ही गरज ओळखली. कामावरून घरी परतल्यानंतर निरमा पावडर शेजारील घरांमध्ये विकत होते. त्यानंतर सायकलवरून त्यांनी धंदा सुरू केला.

त्यावेळी सर्फसारख्या ब्रँडची किंमत १५ ते ३० रुपये किलो होती. तेव्हा करसन पटेल यांनी ३ रुपये किलोनं पावडर विकण्यास सुरूवात केली. चांगली क्वालिटी आणि स्वस्त दरामुळे निरमा ही पावडर सर्वसामान्य लोकांच्या पसंतीस पडली.

नोकरीमुळे व्यवसायाला वेळ देता येत नव्हता म्हणून करसन पटेल यांनी सरकारी नोकरी सोडून दिली. निरमा संपूर्ण देशात पसरवण्याचं मोठं आव्हान करसन पटेल यांच्यासमोर होतं. अशावेळी जिंगल आणि जाहिरातीचा आधार त्यांनी घेतला.

निरमा ब्रँड देशभरात पोहचवण्यासाठी सबकी पसंद निरमा सारखी जाहिरातीचं मोठं योगदान ठरलं. या जाहिरातीनंतर निरमा खरेदी करण्यासाठी स्थानिक बाजारात ग्राहकांची गर्दी झाली. टीव्हीवरील जाहिरात पाहून अनेक ग्राहक निरमा खरेदी करण्यासाठी जात होते. त्यानंतर निरमा इतक्या उंचीवर पोहचला की इतर ब्रँड त्याच्या आसपासही टिकले नाहीत.