सौंदर्याची हौस महागात पडली! नाकाची सर्जरी करायला गेली, अन् दोन्ही पाय कापून बसली...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 03:21 PM2020-12-29T15:21:39+5:302020-12-29T15:26:27+5:30

Plastic surgery : सुंदर दिसण्य़ासाठी लोक कायकाय करतात. अनेक हिरोईन्स तर चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात. या प्लॅस्टिक सर्जरी अनेकदा फसल्याचीही उदाहरणे आहेत. असाच जिवघेणा प्रसंग तुर्कीश महिलेवर ओढवला आहे.

सुंदर दिसण्य़ासाठी लोक कायकाय करतात. अनेक हिरोईन्स तर चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात. या प्लॅस्टिक सर्जरी अनेकदा फसल्याचीही उदाहरणे आहेत. असाच जिवघेणा प्रसंग तुर्कीश महिलेवर ओढवला आहे. यामुळे तिला गुडघ्याखाली दोन्ही पाय कापावे लागले आहेत.

वाचून अंगावर शहारे आले ना. 25 वर्षांची सेविंक सेक्लिकने इस्तंबुलला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नाक कमी करण्याची म्हणजेच 'नोझ रिडक्शन सर्जरी' केली. मात्र, तेव्हा तिला या सर्जरीमुळे पाय़ गमवावे लागतील याचा अंदाजही आला नव्हता.

ऑपरेशन झाल्यानंतर तिला ताप आला होता. महत्वाचे म्हणजे 2 मे 2019 मध्ये तिच्यावर दोन तास सर्जरी करण्यात आली होती. तेव्हा तिची तब्येत ठीक होती. यामुळे तिला डॉक्टरांनी घरी पाठविले.

घरी गेल्यानंतर तिला ताप येऊ लागला. तरीही हॉस्पिटलने सांगितले की, तिची प्रकृती ठीक आहे. एका आठवड्यानंतर ती जेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा तिच्या सर्जरीवेळी असलेल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते.

हॉस्पिटलवाल्यांनी तिच्यामध्ये सर्व लक्षणे सामान्य असून घाबरण्यासारखे कारण नसल्याचे सांगितले होते. सर्जरीनंतर अशी लक्षणे दिसतात असे ते म्हणाले. डॉक्टरांनी दिलेल्या आश्वासनानंतरही तिची हालत दिवसेंदिवस खराब होऊ लागली.

सेविंकच्या भावाने स्थानिक मीडियाला सांगितले की, सर्जरीनंतर अन्न पाणी सोडल्याने ती नेहमीच आजारी पडू लागली, तिच्या पायांचा रंग काळा पडू लागला होता. प्रकृती गंभीर झाल्याने तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

डॉक्टरांनी 9 जूनला सेविंकला ब्लड पॉयझनिंग झाल्याचे सांगितले. आता तिचे प्राण वाचविण्यासाठी तिचे पाय कापण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे सांगितले.

शेवटी मुलीचे प्राण वाचविण्यासाठी कुटुंबियांनी संमती दिली आणि डॉक्टरांनी तिचे पाय कापले.

आता सेविंकने प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच एक कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

दुसरीकडे हॉस्पिटलने या प्रकरणी आपले हात वर केले असून अशाप्रकारे दोषी ठरविणे योग्य नसल्याचे सांगत आपली काही चूक नसल्याचे सांगितले आहे.

हॉस्पिटलने सांगितले की, या मुलीने सर्जरी झाल्यानंतर व हॉस्पिटलाईज होण्याच्या काही दिवस आधीपर्यंत चिकन खाल्ले, यामुळे हे ब्लड पॉयझनिंग झाले. आता न्यायालयाने यावर तज्ज्ञांचे मत मागविले आहे. यावर पुढील एप्रिल पर्यंत काही निर्णय घेतला जाईल.