चिंता वाढली! मास्कमुळे उद्धवताहेत डोळ्यांच्या समस्या?, वेळीच व्हा सावध; अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 08:54 AM2021-02-15T08:54:56+5:302021-02-15T09:11:48+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेतली जाते.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दहा कोटींच्या टप्पा पार केला आहे. तर देशीतील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क (Mask) लावण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. कोरोनाच्या संकटात मास्क अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

मास्कचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहे. मास्क दीर्घकाळ लावून राहिल्याने त्याचे काही दुष्परिणाम होत असल्याची माहिती सतत समोर येतं आहे. मास्क लावल्यानंतर कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.

मास्क सतत लावून राहिल्यामुळे अनेकांना त्वचेवर खाज, पुरळ येणं, कान दुखणं अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासोबतच डोळे कोरडे (Dryness in Eyes) पडत असल्याचंही जाणवलं आहे. जर ही समस्या असेल तर गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

डोळ्यातल्या ओलावा कमी होत असल्यास काही गोष्टी त्यावर उपाय म्हणून करता येतील. आपण मास्क घालतो आणि नाकाने श्वास घेतो. तेव्हा मास्कखालची त्वचा गरम होते. मास्क घातलेल्या असल्याने हवा नीटपणे नाकाच्या आत जाऊ शकत नाही.

आपण श्वास सोडतो तेव्हा ही हवा मास्कवर आदळून डोळ्यांना लागते. हे सतत होत राहतं तेव्हा मग डोळ्यांमध्ये कोरडेपणा वाढतो. आर्द्रता कमी होते. याकारणाने डोळ्यांच्या पृष्ठभागावर सूज येणे आणि जळजळ होणे अशा समस्या उद्भवतात.

तुम्हाला जर दीर्घकाळ मास्क घालून वावरावं लागत असेल तर अशा व्यक्तींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. त्वचा आणि डोळे नीट व सुरक्षित राहतील याची काळजी घेतली पाहिजे.

मास्क घालणं गरजेचंच आहे पण मास्कचा डोळ्यांवर पडणारा प्रभाव नियंत्रणात ठेवला पाहिजे. तुम्ही तासनतास मास्क घालून राहत असाल तर चांगला फिट बसणारा मास्क घातला पाहिजे. असा मास्क घाला ज्यातून हवा वर डोळ्यांकडे जाणार नाही.

मास्कमुळे डोळ्यांखालचा भाग ताणला तर जात नाही ना हे पाहा. शक्य असेल तर मोकळ्या हवेत जाऊन मास्क खाली काढून श्वास घ्या. डोळ्यात जळजळ, खाज अशी लक्षणं सतत जाणवत राहिल्यास डोळ्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना नव्या स्ट्रेनमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची देखील चिंता वाढली आहेय याच दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून कसा बचाव करायचा हे समोर आलं आहे.

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेने आपल्या नागरिकांना दोन मास्क वापरण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनने (सीडीसी) आपल्या रिपोर्टमध्ये याबाबतचे निर्देश दिले आहेत.

सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनच्या (सीडीसी) रिपोर्टनुसार, डिस्पोजेबल सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क वापरल्यास व्हायरसपासून 95 टक्के अधिक सुरक्षिता मिळू शकणार आहे.

सर्जिकल मास्कच्यावर कपड्यांचा मास्क लावल्यास पहिल्या मास्कच्या बाजूने हवा आत जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मास्क पूर्णपणे फिट असल्याने हवा तोंड, नाकावाटे शरिरात जात नाही आणि त्यामुळे नव्या स्ट्रेनपासून बचाव होऊ शकतो असं नमूद करण्यात आलं आहे.

सीडीसीचे संचालक रोचेल वालेंस्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर कमी झाला आहे. कोरोनाच्या संकटात यामुळे दिलासा मिळाला आहे.