'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 13:13 IST2025-12-02T13:09:59+5:302025-12-02T13:13:52+5:30
बोस्टन युनिव्हर्सिटीच्या या नवीन संशोधनातून समोर आले आहे की, तुम्ही मध्यम वयात किंवा त्याहून अधिक वयात व्यायाम सुरू केला तरीही तुमच्या मेंदूसाठी ते परिणाम कारक आहे.

मध्यम वयात व्यायाम सुरू करताना आता उशीर झाला, असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे अजिबात नाही. एका नव्या संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की, मध्यम वयात किंवा त्यानंतरही नियमित व्यायाम सुरू केल्यास अल्झायमर आणि डिमेंशियाचा धोका तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

बोस्टन युनिव्हर्सिटीच्या या नवीन संशोधनातून समोर आले आहे की, तुम्ही मध्यम वयात किंवा त्याहून अधिक वयात व्यायाम सुरू केला तरीही तुमच्या मेंदूला मोठे संरक्षण मिळते.

संशोधनानुसार, शारीरिक हालचालींमुळे, तसेच व्यायामामुळे भरपूर फायदे मिळतात, मेंदूच्या पेशी मजबूत होतात. सूज कमी होते आणि रक्तवाहिन्या निरोगी राहतात. अल्झायमरला कारणीभूत असलेले 'बीटा-अमायलॉइड' प्रोटीन कमी होते. मेंदूला स्मरणशक्तीची अतिरिक्त शक्ती मिळते.

कोणत्याही वयात नियमितपणे केलेली शारीरिक हालचाल केवळ शरीरालाच नाही, तर मेंदूलाही दीर्घकाळ सुरक्षित ठेवू शकते.

अभ्यासकांचे मत आहे की, ४० २ ते ६० वयोगटातील लोकांना व्यायामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची गरज आहे. या अभ्यासात ४,३०० हून अधिक सहभागींच्या अनेक दशकांपासूनच्या आरोग्य नोंदी, व्यायामाची सवय आणि जीवनशैलीशी संबंधित माहितीचे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्यात आले.

















