हिवाळा असो किंवा उन्हाळा; कोरोना संसर्गावर वातावरणातील बदलांचा परिणाम नाही, रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 08:29 PM2020-11-04T20:29:40+5:302020-11-04T20:43:00+5:30

हिवाळ्यात व्हायरल संक्रमण वाढण्याची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे संक्रमणही हिवाळ्यात वाढण्याची शक्यता आहे. युरोपातील काही देशांमध्येही असं दिसून आलं आहे. पण नुकत्यात झालेल्या संशोधनात असं दिसून आलं की, वातावरणातील बदलांचा कोरोना व्हायरसच्या संक्रमणावर काहीही परिणाम होत नाही.

भारतीय आणि अमेरिकी संशोधकांच्या नेतृत्वात हे संशोधन करण्याता आलं होतं. कोरोना व्हायरसच्या प्रसारावर तापमान, आद्रता यांचा काहीही परिणाम होत नाही. असे या संशोधनतून दिसून आले होते. इंटरनेशनल जर्नल ऑफ इनवायरमेंटल रिसर्च एंड पब्लिक हेल्थमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे.

या संशोधनात स्पष्ट करण्यात आलं होतं की, कोरोना विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून इतर व्यक्तीकडे होणं हे संपूर्णपणे उन्हाळ्यावर किंवा हिवाळ्यावर नव्हे तर मानवी वर्तनावर अवलंबून असते. संशोधकाने हे अधोरेखित केले की एखाद्या नवीन व्यक्तीस संसर्ग होण्यापूर्वी कोरोना व्हायरस ज्या वातावरणामध्ये जीवंत राहिलेला असतो. त्याच वातावरणात तो अधिकवेळ राहू शकतो.

हवामानाचा मानवी शरीरावरही देखील परिणाम होतो ज्याद्वारे व्हायरस एका व्यक्तीकडून इतर व्यक्तीस संक्रमित करतो.

प्राध्यापक देव नियोगी यांनी अमेरिकेच्या ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठात या अभ्यासाचे नेतृत्व केले. ते म्हणाले, "कोरोनाच्या प्रसारामध्ये हवामानाचा प्रभाव कमी असतो. लोकांच्या सवयींसारख्या इतर बाबी संसर्ग पसरविण्यात अधिक प्रभावी ठरतात. जर आपण संसर्गाच्या प्रसारासंदर्भात विविध घटकांचा विचार केला तर हवामान हा शेवटचा घटक आहे.''

या अभ्यासात तापमान, आद्रता, वातावरणातील इतर बदल यांबाबत संशोधन करण्यात आले होते. वैज्ञानिकांनी मार्च ते जुलै 2020 पर्यंत अमेरिकेच्या विविध भागांव्यतिरिक्त विविध देश आणि जागतिक पातळीवर कोरोना विषाणूच्या प्रसाराचे विश्लेषण केले होते.

संशोधकांच्या मते, संसर्गाच्या प्रसारामध्ये हवामानाचे महत्त्व तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असलेल्या कोणत्याही विशिष्ट हवामानाचे कोणतेही संकेत नाही.

दरम्यान अमेरिकेतील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक लस तयार करण्याचा दावा केला आहे. या लसीचा वापर प्राण्यांवर करण्यात आला होता. ही लस तयार करत असलेल्या संशोधकांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वाशिंग्टनमधील तज्ज्ञांचाही समावेश आहे.