Green Tea Side effects: वजन घटवण्यासाठी ग्रीन टी पिताय? सावधान! दुष्परिणामही जाणून घ्या, आहेत फारच गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 03:23 PM2022-06-24T15:23:12+5:302022-06-24T15:34:23+5:30

वजन घटवण्यापासून ते अगदी कर्करोग आणि हृद्यरोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव होण्यासाठी 'ग्रीन टी' हितकारी आहे. हे अनेकांना ठाऊक आहे. त्यामुळे नेहमीचा चहा टाळून अनेकांनी त्यांच्या दिनक्रमात 'ग्रीन टी'चा समावेश केला आहे. चायनात उगम झालेल्या 'ग्रीन टी'चा आता पाश्चिमात्य देशांमध्येही वापर वाढला आहे. पण या आरोग्यदायी चहाचे शरीरावर काही दुष्परिणामही होतात हे तुम्हांला ठाऊक आहे का?

जेव्हा वजन कमी करायचे असते तेव्हाच ग्रीन टी पिण्याचा विचार आपल्या मनात येतो. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एखाद्या व्यक्तीला दिवसातून एकदा ग्रीन टी पिणे पुरेसे आहे का? किंवा एक कप पेक्षा जास्त ग्रीन टी प्यावी का? अधिक ग्रीन टी प्यायल्याने आपले वजन लवकर कमी होते का? हे सर्व असे प्रश्न आहेत जे प्रत्येक वजन कमी करणाऱ्या व्यक्तीच्या मनात वारंवार येतात.

ग्रीन टी प्यायल्याने वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर इतरही अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. हेल्थ लाईनच्या माहितीनुसार, यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स कॅन्सरपासून बचाव करण्यातही मदत करतात. यासोबतच ग्रीन टी त्वचा आणि चयापचय क्रियांसाठीही खूप उपयुक्त आहे. आज जाणून घेऊया एका व्यक्तीने दिवसात किती ग्रीन टी प्यायला हवी. यासोबतच जास्त पिण्याचे दुष्परिणामही आपल्याला कळतील.

एखादी व्यक्ती एका दिवसात किती ग्रीन टी पिऊ शकते? एखादी व्यक्ती दिवसातून तीन ते पाच कप ग्रीन टी पिऊ शकते. मात्र, कोणताही शारीरिक त्रास नसेल तर एखादी व्यक्ती एका दिवसात इतका ग्रीन टी पिऊ शकते. परंतु जर कोणाला मधुमेह, कर्करोग किंवा हृदयविकार असतील तर तुम्ही एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ग्रीन टी घेण्याबाबत प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या गरजा वेगवेगळ्या असल्या तरी, आपल्या शरीराचा विचार करून आपण दररोज ग्रीन टीचे प्रमाण ठरवावे. तथापि, जर तुम्ही ग्रीन टीचे अधिक सेवन केले तर काही दुष्परिणाम देखील दिसू शकतात.

'ग्रीन टी'मधील काही घटकांमुळे पदार्थांतून आयर्न (लोह) शोषून घेण्याची क्षमता कमी होते. परिणामी अ‍ॅनिमिया जडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जेवणासोबत ग्रीन टी पिण्याची तुमची सवय आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. म्हणून जेवणाच्या वेळी ग्रीन टी पिणे आवडत असल्यास आहारात आयर्न आणि व्हिटामिन सी यांचे मुबलब प्रमाण असलेले अन्नपदार्थ निवडा.

गर्भवती स्त्रिया किंवा स्तनपान देणार्‍या स्त्रियांनी दिवसांतून 2 कपापेक्षा अधिक ग्रीन टी पिणे टाळावे. या चहामध्ये 200 mg कॅफिन असते. यापेक्षा अधिक चहा प्यायल्यास गर्भपात होण्याची भीती असते. स्तनपानाच्या वेळेस दूधातून कॅफिन बाळाच्या शरीरात जाऊन त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

दिवसांतून 2-3 कपांपेक्षा अधिक ग्रीन टी पिणे टाळा. तसेच उपवासाच्या दिवशी किंवा रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्यातील टॅनिनस घटक पोटातील अ‍ॅसिडीटी वाढते. परिणामी उलट्या होणे, मळमळणे अशा समस्या उद्भवू शकतात.

ग्रीन टी प्यायल्यानंतर लगेच काही औषधं घेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चेतासंस्थेवर परिणाम करणारी उत्तेजक औषधं ग्रीन टी सोबत पिणे टाळा. त्यातील कॅफिन घटकाचा चेतासंस्थेवर परिणाम झाल्यास रक्तदाब वाढणे, हृद्याचे ठोके वाढणे अशा समस्या वाढू शकतात.

कॅफिन प्रामुख्याने कॉफीमध्ये आढळते. पण कपभर ग्रीनमध्येही त्याचे प्रमाण सुमारे 24-45 mg इतके असते. प्रमाणात ग्रीन टी प्यायल्यास त्याचा त्रास होण्याचा धोका कमी असतो मात्र 5-7 कप ग्रीन टी प्यायल्यास खालील आजार वाढू शकतात.

ग्रीन टीच्या साइड इफेक्टसवर झालेले अभ्यास सांगतात की ग्रीन टी मुळे हदयाचे ठोके अनियमित होतात. रक्तदाब अती प्रमाणात कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे ग्रीन टी हा जरी आरोग्यदायी असला तरी आपल्या तब्येतीला तो किती चालेल हे जाणून घेण्यासाठी याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे उचित असं तज्ज्ञ म्हणतात.