Omicron Variant : ओमायक्रॉन 5 पट जास्त संसर्गजन्य, पण अद्याप गंभीर लक्षणे आढळून आली नाहीत - आरोग्य मंत्रालय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 08:29 PM2021-12-02T20:29:36+5:302021-12-02T20:44:12+5:30

Omicron Variant : कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरात चिंता वाढवली आहे. जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण असल्याची पुष्टी झाली आहे. यातच आता भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant Cases in India) शिरकाव केला आहे.

भारतातील कर्नाटकात राज्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळले आहेत. यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी सांगितले की, या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळे (Coronavirus New Variant) कोणतीही गंभीर लक्षणे आढळली नाहीत.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पुराव्यांचा अभ्यास करत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले. तसेच, ओमायक्रॉन व्हेरिएंट व्हायरसच्या इतर व्हेरिएंटपेक्षा 5 पट जास्त संसर्गजन्य आहे. पण मास्कचा वापर करणे हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे, असेही लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत ओमायक्रॉनशी संबंधित सर्व प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. देशभरात आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतीही गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, जे काही प्राथमिक पुरावे आहेत त्याचा अभ्यास केला जात आहे, असेही लव अग्रवाल म्हणाले.

याशिवाय, लव अग्रवाल यांनी असेही सांगितले की, 'जोखीम असलेल्या' देशांतून येणाऱ्या प्रवाशांना येताना आरटी-पीसीआर चाचणी करावी लागेल. जर प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर त्याच्यावर निर्धारित क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल अंतर्गत उपचार केले जातील. तसेच, जर प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली तरी त्याला सात दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल.

जिनोम सिक्वेंसिंगद्वारे कर्नाटकातील दोन रुग्णांना कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाल्याचे समोर आले आहे. देशात 37 लॅब आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले म्हणून लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, परंतू काळजी घेणे गरजेचे आहे, असेही लव अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 66 वर्षीय आणि 46 वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे.

या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. दोन्ही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. देशात आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतेही गंभीर लक्षण आढळून आलेले नाही. आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमायक्रॉन सापडला आहे.