जाणून घ्या, आवळा खाण्याचे आरोग्यदायी फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 03:24 PM2020-07-27T15:24:45+5:302020-07-27T15:51:07+5:30

सध्या देशात कोरोनासारख्या महामारीचे संकट ओढावले. अशा गंभीर आजारांविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे.

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे. शरीरास पोषक असणाऱ्या तसेच मोसमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळ-भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यापैकीच एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा.

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे.

आवळा या फळात अनेक गुणधर्म आहेत. मोरावळा, पेठा, सुपारी, लोणचे, सरबत इ. प्रवासातला महत्त्वाचा सोबती. आवळा सुपारी व पेठा सर्वांनाच परिचित आहे.

छोट्या असलेल्या या फळामुळे शरीर शुद्ध (Detox) होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात.

आयुर्वेदात आवळ्याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. पित्तशामक, केशवर्धक, शक्तीवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते.

आवळा सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांचे प्रॉब्लेम यामध्ये अराम मिळतो.

आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्याने याचा फायदा डोळ्यांना नक्कीच होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेस यासारखे आजार दूर होतात.

मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठया प्रमाणावर असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते.

आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो.

आवळ्याचे शास्त्रीय नाव फायललँथस एम्ब्लिका आहे. फायलँथस हे नाव एका ग्रीक शब्दावरून पडले असून त्याचा अर्थ पानावर असलेली फुले, असा होतो.

(टिप - आवळ्यामध्ये आरोग्याविषयी अनेक गुणधर्म असले तरी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचे सेवन करावे.)