काळजी वाढली! थंडी अन् प्रदूषणामुळे कोरोनाचा प्रसार वाढणार, एम्सच्या डॉक्टरांची धोक्याची सुचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 11:44 AM2020-10-09T11:44:43+5:302020-10-09T12:13:23+5:30

CoronaVirus News & latest Updates : प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना संक्रमित रुग्णांमध्येही वाढ होऊ शकते.

कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळ्यात कोरोना व्हायरसचा प्रसारआधीपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रसाराबाबत धोक्याची सुचना दिलीआहे. डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले की, प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना संक्रमित रुग्णांमध्येही वाढ होऊ शकते.

डॉक्टर गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदुषणाच्या पीएम २.५ स्तरात वाढ झाल्यास कोरोनाच्या संक्रमणात ८ ते ९ टक्क्यांनी वाढू शकते. कोरोनासोबतच प्रदूषण वाढण्यामुळे श्वसन आणि फुफ्फुसांसंबंधी आजार वाढू शकतात. इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले की, हिवाळ्यात लोकांनी नेहमीपेक्षा जास्त सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. चीन आणि इटलीतील माहितीचे उदाहरण देत त्यांनी पीएम २.५ च्या पातळीत वाढ झाल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत ८ ते ९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले आहे.

२२ सप्टेंबरला द लेसेंट या वैद्यकिय नियतकालिकात यात छापण्यात आलेल्या माहितीनुसार चीन आणि युरोपात लॉकडाऊनमुळे वायुप्रदूषणात कमतरता दिसून आली. या अभ्यासात सांगण्यात आलं होतं की, हवेमार्फत परसरत असलेल्या प्रदूषणात कमतरता झाल्याने श्वसनासंबंधी आजार तसंच मृत्यूदर कमी करण्यास मदत होऊ शकते.

डॉक्टर गुलेरिया यांनी पुढे सांगितले की, ''हवा प्रदुषणामुळे फुफ्फुसांना सुज येते आणि कोरोना व्हायरसही मुख्य स्वरुपात फुफ्फुसांवर परिणाम करतो. अशा स्थितीत गंभीर संक्रमण पसरण्याचा धोका असतो. म्हणून मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळणं गरजेचं आहे.''

डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितले की, हिवाळ्याच्या वातावरणात जास्तीत जास्त लोक घरी आराम करणं पसंत करतात. या कालावधीत संक्रमण सहज एका व्यक्तीकडून इतरांपर्यंत पद्धतीने पसरू शकतं. कारण हिवाळ्याच्या दिवसात किंवा थंड वातावरणात श्वसनासंबंधी समस्या निर्माण करणारे व्हायरस मोठ्या प्रमाणावर पसरतात. म्हणून या प्रकारच्या आजारात वाढ झालेली दिसून येते.

एका रिसर्चमधून समोर आलेल्या माहितीनुसार इन्फुएंजा यांसारखे आजार भारतात दोन वेळा पसरतात. एकदा पावसाळ्यात त्यानंतर हिवाळ्यात, कोरोना व्हायरसही श्वसनाचे व्हायरस संकमण पसरवत असून इन्फ्लुएंजाप्रमाणेच आहे. मास्क, सोशल डिस्टेंसिंग, वैयक्तीक स्वच्छता पाळून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत कमी व्हायरसचा प्रसार कमी करता येऊ शकतो.

भारतात आता सण उत्सव सुरू होणार असून डॉक्टर गुलेरिया यांनी लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. त्यांनी सांगितले की, सण उत्सवांच्याकाळात गर्दी वाढण्याची शक्यता जास्त असते. निष्काळजीपणा संक्रमण पसरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून लोकांनी गर्दी टाळून किंवा घरच्याघरी सण उत्सव साजरे करायला हवेत.

कोरोना लसीबाबत बोलताना डॉक्टर गुलेरिया म्हणले की, लसीचे वितरण प्राथमिकता आणि निर्धारण वैज्ञानिक पद्धतीने करायला हवे. ज्या लोकांना गंभीर आजार आहे किंवा मृत्यचा धोका जास्त आहे. अशा लोकांना लस सगळ्यात आधी दिली जावी. कारण कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर रोखणं हे आपलं लक्ष्य आहे.

दरम्यान अमेरिकेची प्रमुख आरोग्यसंस्था सीडीसीने (Centers for Disease Control and Prevention) कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत नवीन गाईडलाईन्स दिल्या आहेत. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचा प्रसार हवेच्या माध्यमातूनही होऊ शकतो.

हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे व कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी. लग्नसमारंभ, धार्मिक स्थळ, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे. हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच. सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे. या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो.