Diabetes cure : डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूशखबर! बायोकॉनच्या नवीन औषधाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 04:26 PM2021-07-30T16:26:09+5:302021-07-30T16:35:45+5:30

Diabetes cure : USFDAद्वारे सेमग्लीला (इन्सुलिन ग्लारजीन) मान्यता दिली आहे.

डायबिटीजच्या रुग्णांना आता रक्तातील साखर कमी करण्यासाठी केवळ इन्सुलिनवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (USFDA) बायोकॉन-व्हायट्रिस औषध सेमग्लीला मान्यता दिली आहे.

डायबिटीजच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या इन्सुलिनप्रमाणे कार्य करणारे हे पहिले इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रोडक्ट आहे. USFDAद्वारे सेमग्लीला (इन्सुलिन ग्लारजीन) मान्यता दिली आहे. म्हणजे आता ते सनोफीचे औषध लँटसची जागा घेईल.

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय पर्याय म्हणून रुग्ण आता हे औषध मेडिकल स्टोअरमधून खरेदी करू शकतात. हे बायोसिमिलर औषध बायोकॉन बनवणार आहे, तर अमेरिकेत सेमग्लीची मार्केटिंग बायोकॉनची भागीदार कंपनी व्हायट्रिस करणार आहे.

USFDAचे कार्यकारी आयुक्त जेनेट वुडकॉक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, "डायबिटीजवर उपचार करण्यासाठी दररोज इन्सुलिनवर अवलंबून असणार्‍यांसाठी हा महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण बायोसिमिलर आणि इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रोडक्ट स्वस्त आहे."

जेनेट वुडकॉक म्हणाले, "पहिल्यांदा इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रोडक्टला मिळालेली मान्यता बायोलॉजिकल औषधे बाजारात आणण्याची यूएसएफडीएची दीर्घकालीन प्रतिबद्धता दिसून येते. कमी किंमतीत बनविलेली ही सुरक्षित, प्रभावी आणि दर्जेदार औषधे आहेत. जी रुग्णांना मदत करण्यासाठी प्रभावी ठरतील."

बऱ्याच दिवसांपासून काम करणाऱ्या या इन्सुलिनपासून ग्लायसेमिक कंट्रोलमध्ये सुधारणा दिसून येते.जगभरात टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीजचे कोट्यावधी रुग्ण आहेत.

कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात डायबिटीज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत ही नवीन औषधे रुग्णांना दिलासा देण्याचे काम करतील.

यूएसएफडीएचे म्हणणे आहे की, हे इंटरचेंजेबल बायोसिमिलर औषध सुरक्षितता आणि सामर्थ्याच्या बाबतीत इतर औषधांसारखीच आहेत आणि त्यांच्या क्लिनिकल परिणामांमध्ये कोणताही फरक नाही.

जर एखादा रुग्ण यापूर्वी लँटस घेत असेल तर सेमग्ली वापरल्यानंतर त्याला काहीच फरक पडणार नाही. सेमाग्लीला पहिल्यांदा जून 2020 मध्ये मानवी इन्सुलिन अॅनालॉग म्हणून मंजूर करण्यात आले होते.

एफडीएने आता हेल्थ केअर प्रोव्हायडर्ससाठी काही नवीन साहित्य जारी केले आहे, कारण ते इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रोडक्टबद्दल जाणून घेऊ शकतील. यामध्ये एक नवीन फॅक्टशीट (तथ्यपत्रक) देखील समाविष्ट आहे, ज्यामध्ये इंटरचेंजेबल बायोसिमिलर प्रोडक्टबद्दल सविस्तर दिले आहे.