Coronavirus : पालकांना कोरोना व्हायरसाबाबत 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 10:09 AM2020-03-05T10:09:01+5:302020-03-05T10:22:02+5:30

Coronavirus : अर्थातच लोकांच्या मनात कोरोना व्हायरसबाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. यूनिसेफकडून लोकांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. ज्यातील काही प्रश्नांची उत्तरे देत आहोत.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या जाळ्यामुळे सर्वांमध्ये एक भीती बघायला मिळत आहे. मात्र, सरकारकडून नियमित माहिती दिली जात आहे की, स्थिती सामान्य आहे आणि त्यांनी घाबरण्याची गरज नाही. तरी सुद्धा या व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.

अर्थातच लोकांच्या मनात कोरोना व्हायरसबाबत वेगवेगळे प्रश्न आहेत. यूनिसेफकडून लोकांच्या मनात येणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. ज्यातील काही प्रश्नांची उत्तरे देत आहोत.

नोवेल कोरोना व्हायरस काय आहे? - हे एका व्हायरसचं नाव आहे. नोवेल कोरोना व्हायरस या रोगाची सुरूवात चीनमधील वुहान शहरातून झाली. याची लागण झाली तर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि काही सर्दीसारखे सामान्य लक्षणेही दिसतात.

कसा पसरतो हा व्हायरस? - कोरोना व्हायरस या व्हायरसने संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने पसरतो. साधारणपणे हा व्हायरस खोकलल्याने आणि शिंकल्याने जास्त पसरतो. त्यासोबतच संक्रमित व्यक्ती द्वारे स्पर्श केल्यानेही हा व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. त्या व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंना स्पर्श केल्यानेही हा व्हायरस पसरतो.

कोरोना व्हायरसची लक्षणे काय आहेत? - कोरोना व्हायरसची काही खास लक्षणे डॉक्टरांकडून सांगण्यात आली आहेत. कोरोना व्हायरसने संक्रमित व्यक्तीला आधी ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास अशा समस्या होतात. सर्दीसोबत काही लोक या व्हायरसने संक्रमित झाल्यावर चक्कर येऊन पडतात. सर्दी-खोकल्यासारखीच लक्षणे यात दिसतात, त्यामुळे व्हायरसचं संक्रमण झालं की नाही हे समजणं अवघड जातं.

बचाव कसा करता येऊ शकतो? - कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. हात नियमित साबणाने किंवा सॅनिटायजरने स्वच्छ करा. तसेच मास्क लावावा. खोकलताना आणि शिंकताना रूमाल वापरा. रूमाल एकदा वापरून झाला की, फेका. सर्दी-खोकला असलेल्या लोकांच्या जास्त जवळ जाऊ नका. जर लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास समस्या होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मास्क कुणी वापरावा? - होय, जर तुम्हाला सर्दी-खोकला झाला असेल तर तुम्ही मेडिकल मास्क वापरण्याची गरज आहे. तुम्ही निरोगी असाल, तुमचं स्वास्थ्य चांगलं असेल तर तुम्ही मास्क वापरण्याची गरज नाही, असं WHO कडून सांगण्यात आलं आहे. मात्र, सर्दी-खोकला, ताप असेल तर मास्क वापरा. तुम्ही कोरोना व्हायरसने संक्रमित व्यक्तीची देखरेख करत असाल तर मास्क वापरा.

लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना संक्रमण होऊ शकतं का? - सध्या तरी याबाबत काही ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, लहान मुले कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्याच्या केसेस फार कमी आढळून आल्या आहेत. तसेच गर्भवती महिलांना संक्रमणाची स्थिती डॉक्टर लवकरच सांगतील. त्यामुळे लहान मुलांना आणि गर्भवती महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क वापरायला द्या. तसेच याची काळजी घ्यावी की, या व्हायरसने संक्रमित व्यक्ती लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या संपर्कात येणार नाहीत.

लहान मुलांमध्ये लक्षणे कसे ओळखाल? - लहान मुलांमध्ये व्हायरसची लक्षणे ओळखण्यासाठी या व्हायरसची सामान्य लक्षणे समजून घ्या. लहान मुलांना सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणे दिसत असतील तर वेळीच त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा. दरम्यान त्यांना सर्दी झाल्यावर मास्क वापरू द्या.

फोर्ब्सच्या रिपोर्टमध्येही मास्क गरजेचा नाही - जर तुम्हाला इन्फेक्शन नसेल तर मास्क घालणं गरजेचं नाही, असं FORBES च्या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ आयोवा कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये मेडिसिन आणि महामारी विज्ञानान्या प्रोफेसर एली प्रेन्सेविक यांच्यानुसार, तुम्ही मास्क वापरण्याची गरज नाही. त्यांनी सांगितले की, तुम्ही जर निरोगी असाल तर तुम्ही एन९५ मास्क घालण्याची काहीच गरज नाही. कारण याचा आतापर्यंत कोणताही पुरावा समोर आला नाही की, निरोगी लोक मास्क घालून कोरोना व्हायरसपासून बचाव करू शकतात. उलट लोक मास्क चुकीच्या पद्धतीने घालतात आणि सतत मास्कला हात लावतात. याने त्यांना धोका वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही आजारी असाल तरच मास्क वापरा.