CoronaVirus News: ...तर तुम्हाला कोरोना होण्याचा धोका होईल कमी; फक्त स्वत:ला 'ही' एक सवय लावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 05:28 PM2021-04-23T17:28:26+5:302021-04-23T17:35:48+5:30

CoronaVirus News: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतोय.. कोरोनाची लागण टाळायची असेल, तर एक सवय लावून घ्या

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशात पहिली लाट आली होती. त्यावेळी दिवसाकाठी आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखाच्या जवळ पोहोचला होता. आता मात्र देशात दररोज ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठाच्या संशोधकांनी याबद्दल महत्त्वाचं संशोधन केलं आहे. यानुसार केवळ एका सवयीमुळे कोरोनाचा धोका ३१ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

दररोज व्यायाम करून शरीर तंदुरुस्त राखल्यास कोरोनाचा धोका कमी होतो. यासोबतच कोरोनावरील लसदेखील अधिक प्रभावी ठरते, असं विद्यापीठाचं संशोधन सांगतं.

दैनंदिन व्यायाम आणि कोरोनाशी लढा देण्यास आवश्यक असलेली प्रतिकारकशक्ती याबद्दल पहिल्यांदाच जगात संशोधन झालं आहे. यानुसार दररोज ३० मिनिटं, आठवड्यातून ५ दिवस किंवा १५० मिनिटं व्यायाम केल्यास श्वास घेण्यास अडचणी येत नाहीत.

दररोज चालल्यास, धावल्यास, सायकल चालवल्यास आणि मांसपेशी सशक्त करणारे व्यायाम केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.

दररोज व्यायाम केल्यास कोरोना लसीची क्षमतादेखील ४० टक्क्यांनी वाढते. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त होत असल्यानं लस अधिक प्रभावी ठरते.

दैनंदिन व्यायामामुळे कोरोना होण्याचा धोका ३१ टक्क्यांनी कमी होतो. तर कोरोना झाल्यास मृत्यूमुखी पडण्याची शक्यता ३७ टक्क्यांनी कमी होते.

कोरोनाची लस घेण्याआधी १२ आठवडे व्यायाम करण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. नियमित व्यायाम केल्यास शरीर बळकट होतं. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

दररोज श्वासाचे व्यायाम केल्यास फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. कोरोना विषाणू थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो. दररोज श्वासाचे व्यायाम केल्यास फुफ्फुसामध्ये ऑक्सिजन जास्त प्रमाणात जातो.

तुम्हाला घराबाहेर जाऊन व्यायाम करता येत असल्यास धावणं, सायकलिंग करू शकता. वेगानं चालणं, दोरीच्या उड्या मारणं यामुळेही फुफ्फुसाची स्थिती उत्तम राहते. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो.

Read in English