CoronaVirus News: ओमिक्रॉन डेल्टापेक्षा ६ पट घातक; 'या' ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:20 PM2021-11-29T12:20:35+5:302021-11-29T12:23:27+5:30

CoronaVirus News: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका; संपूर्ण जगाच्या चिंतेत भर

कोरोना विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. आफ्रिकेत आढळून आलेल्या व्हेरिएंटमुळे जगभरातील देश सतर्क झाले आहेत. अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांनी सीमा पुन्हा बंद करण्यास सुरुवात केली आहे.

ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे. या व्हेरिएंटवर मोनोक्लोनल एँटीबॉडीज थेरेपीचा कोणताही परिणाम होत नाही. या व्हेरिएंटचा धोका नेमका किती आणि त्याची लक्षणं काय याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन सहापट अधिक शक्तिशाली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळेच भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती. या लाटेनं शिखर गाठलं तेव्हा दररोज ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली.

ओमिक्रॉन व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त संक्रामक असून तो लसीकरणामुळे तयार होणारी रोगप्रतिकारशक्ती निष्प्रभ करू शकतो, असं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलं आहे. डेल्टा व्हेरिएंटविरोधात मोनोक्लोनल एँटीबॉडीज थेरेपी उपयोगी ठरत होती. मात्र डेल्टा प्लसविरोधात ती निरुपयोगी ठरली. ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दलही तेच दिसून येत आहे.

आतापर्यंत ओमिक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून आली असल्याची माहिती डॉ. एँजेलिक कोएत्जी यांनी दिली. डॉक्टर एँजेलिक कोएत्जी यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट शोधून काढला आहे.

ओमिक्रॉनची लक्षणं सर्वप्रथम एका ३० वर्षीय तरुणामध्ये आढळून आल्याचं कोएत्जी यांनी सांगितलं. त्याला प्रचंड थकवा जाणवत होता. त्याला काही प्रमाणात डोकेदुखीचा त्रास होता. संपूर्ण शरीरात वेदना जाणवत होत्या, अशी माहिती कोएत्जी यांनी दिली.

याआधी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना घशात खवखव जाणवायची. मात्र ओमिक्रॉनची लागण झालेल्याना ती समस्या जाणवत नाहीए. या रुग्णांना खोकल्याचा त्रास होतोय. पण त्यांच्या तोंडाची चव गेलेली नाही. वास घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम झालेला नाही, असं डॉ. कोएत्जी यांनी सांगितलं.

ओमिक्रॉनची लागण झालेल्या सुरुवातीच्या काही रुग्णांमध्ये या समस्या आढळून आल्या. मात्र या व्हेरिएंटची नेमकी लक्षणं जाणून घेण्यासाठी अधिकाधिक रुग्णांचा अभ्यास गरजेचा असल्याचं कोएत्जी म्हणाल्या. डॉक्टरांनी तपासलेल्या रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाली होती. त्याच्या संपूर्ण कुटुंबालादेखील याच व्हेरिएंटची बाधा झाल्याचं चाचणीतून समोर आलं.

सर्वप्रथम आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉननं आता अनेक देशांत प्रवेश केला आहे. जर्मनी, इटली, बेल्जियम, इस्रायल, हाँगकाँगमध्ये शनिवारी ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले.

Read in English