आता कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरणार हा 'नेझल स्प्रे'; तज्ज्ञांचा दावा

By manali.bagul | Published: October 1, 2020 11:43 AM2020-10-01T11:43:55+5:302020-10-01T11:58:23+5:30

गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणातून बाहेर येण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस आणि विविध उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे.

ऑस्ट्रेलियाच्या बायोटेक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तयार केलेल्या नेझल स्प्रेच्या वापरानं कोरोना व्हायरसची वाढ रोखता येऊ शकते. प्राण्यांवर केलेल्या गेलेल्या एका अभ्यासात या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. हा स्प्रे कंपनीकडून कॉमन कोल्ड आणि फ्लूचा सामना करत असलेल्या लोकांची रोगप्रतिकारकशक्ती चांगली बनवण्यासाठी तयार करण्यात आला होता.

रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार एना रेसपिरेटरी या कंपनीने अशी माहिती दिली आहे की, INNA-051 नावाचं हे उत्पादनाचा प्रयोग फेरट नावाच्या प्राण्यावर केला गेला होता. या चाचणीदरम्यान हा नेझल स्प्रे कोरोना व्हायरसची वाढ रोखण्यासाठी ९६ टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले.

पुढच्या टप्प्यातील चाचणीत INNA-051 हा नेजल स्प्रे यशस्वी ठरला तर लसीसोबत या स्प्रेचाही वापर कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केला जातो. सुरूवातीला या अभ्यासाचे नेतृत्व ब्रिटेनची सरकारी संस्था पब्लिक हेल्थ इंग्लँडने केले होते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यांच्या आत नेझल स्प्रे INNA-051 च्या मानवी चाचणीला सुरूवात होऊ शकते. यासाठी हा स्प्रे सुरक्षित असल्याचे सिद्ध करावे लागले. त्यानंतर मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात येईल.

दरम्यान जगभरात कोरोनाच्या संक्रमित रुग्णांची संख्या एकूण ३ कोटी ३३ लाख आहे. तर आतापर्यंत १० लाख २ हजारापेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचे सगळ्यात जास्त रुग्ण अमेरिका, भारतात दिसून येत आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाची लस विकसित करण्यासाठी एक अभ्यास केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील तीन लसी या वैद्यकिय परिक्षणाच्या टप्प्यात आहेत. ज्या लसींची सध्या वैद्यकिय चाचणी सुरू आहे. त्या लसी २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यात उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

आरोग्यमंत्र्याच्या या वक्तव्यानंतर जानेवारी ते मार्चपर्यंत देशात कोरोनाची लस लॉन्च होऊ शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे.

डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लसीचे अपडेट्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑनलाईन पोर्टलसुद्धा लॉन्च केले आहे. आता प्रत्येक व्यक्ती या ऑनलाईन पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन लसीचा विकास, चाचणी, पुढील आयोजन याबाबत माहिती मिळवू शकतो.

Read in English