Steam Side Effects: वाफ घेतल्यानं कोरोना विषाणूचा खात्मा शक्य?; जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 04:23 PM2021-04-24T16:23:20+5:302021-04-24T16:28:04+5:30

Steam Side Effects: दररोज वाफ घेतल्यास कोरोनापासून बचाव होतो, वाफेमुळे कोरोना विषाणूचा खात्मा होतो, असे दावे करणारे मेसेज व्हायरल

गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात दिवसभरात पहिल्यांदा कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण आढळून आले होते. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा तीन लाखांच्या पुढे गेला.

कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सोशल मीडियावर अनेक उपाय सुचवले जात आहेत. हे उपाय मोठ्या प्रमाणात व्हायरलदेखील होतात. अनेकजण त्यांचा वापरदेखील सुरू करतात. यातलाच एक उपाय म्हणजे गरम पाण्याची वाफ घेणं.

गरम पाण्याची वाफ घेतल्यास उष्णतेमुळे कोरोनाचा विषाणू मरतो, असा दावा व्हायरल पोस्टमध्ये/मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मात्र यावर अद्याप तरी कोणतंही संशोधन झालेलं नाही.

दिवसातून १५ ते २० मिनिटं वाफ घ्या, असा सल्ला व्हायरल मेसेजमधून देण्यात आला आहे. मात्र यामुळे कोरोनाच्या विषाणूचा खात्मा होईल, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन (सीडीसी) किंवा जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलेलं नाही.

कोरोना संकटात वाफ घेणं जोखमीचं ठरू शकतं, असं सीडीसीनं म्हटलं आहे. वाफ घेतल्यानं कोरोना विषाणूचा नायनाट होतो, या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचंही सीडीसीनं सांगितलं आहे.

वाफ घेतल्यानं एखादी व्यक्ती भाजली जाऊ शकते किंवा तिला जखमी होऊ शकते, असा धोका सीडीसीनं सांगितला आहे. वाफ घ्यातल्यानं नाक मोकळं होतं, श्वासोच्छवास सुधारतो, असं तज्ज्ञ सांगतात. मात्र कोरोनाचा खात्मा होतो का, याबद्दल कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

फुफ्फुस अतिशय नाजूक असतात. त्यामुळे उष्ण वाफा घेतल्यास फुफ्फुस आणि वायूमार्गला इजा होऊ शकते, असं टेक्सास ए अँड एम विद्यापीठातील जीवशास्त्र विभागात काम करत असलेल्या डॉ. बेंजामिन नीमन यांनी सांगितलं.

वाफ घेतल्यास श्वसनासंबंधीच्या अडचणी दूर होण्यात मदत होते. परंतु त्यामुळे कोरोना विषाणूचा खात्मा होत नाही, अशी माहिती अमेरिकन लंग असोसिएशनचे मुख्य चिकित्सा अधिकारी अल्बर्ट रिजो यांनी दिली.

एका स्पॅनिश संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेल्या लेखातही वाफ घेतल्यानं कोरोना विषाणू मरत नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. भांड्यात गरम पाणी घेऊन डोक्यावर टॉवेल घेऊन वाफ घेतल्यानं इजा होऊ शकते, असं या संस्थेनं लेखात म्हटलं आहे.

गरम पाण्याच्या वाफा घेतल्यास कोरोना होत नाही, त्यामुळे कोरोना टाळता येतो, यामध्ये तथ्य नसल्याचं वेंडरबिल्ट विद्यापीठात साथीचे रोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विल्यम शेफनर यांनी सांगितलं.