coronavirus: कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात एवढे दिवस राहते रोगप्रतिकारशक्ती, समोर आली महत्त्वपूर्ण माहिती

By बाळकृष्ण परब | Published: October 14, 2020 11:27 PM2020-10-14T23:27:41+5:302020-10-14T23:46:48+5:30

Corona virus Immunity : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या शरीरात किंती दिवसांसाठी रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगाला गेल्या दहा महिन्यांपासून वेठीस धरले आहे. कोरोनाविरोधात अद्याप कुठलीही लस पूर्णपणे विकसित होऊ शकलेली नाही. त्यात सातत्याने वाढत असलेल्या संसर्गामुळे चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींच्या शरीरात किंती दिवसांसाठी रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते, याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात कोविड-१९ विरोधातील रोगप्रतिकारशक्ती किती दिवस राहते हे जाणून घेण्यासाठी अमेरिकी संशोधकांनी सहा हजार कोरोनाबाधितांचे नमुने घेतले होते. त्यामधून कोरोनामुक्त व्यक्तीच्या शरीरात कोरोनाविरोधातील प्रतिकारशक्ती किमान पाच महिन्यांपर्यंत राहते, असे समोर आले आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनामधील भारतीय वंशाच्या असोसिएट्स प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले.

या संशोधनादरम्यान, संशोधकांना दिसून आले की, SARC-CoV-2 विरोधात व्यक्तीच्या शरीरात विकसित होणारे प्रतिपिंड (अँटीबॉडी) सुमारे पाच महिन्यांपर्यंत राहतात. प्राध्यापक दीप्ता भट्टाचार्य यांनी सांगितले की, SARC-CoV-2 चा संसर्ग झाल्यानंतर शरीरामध्ये पाच ते सात महिन्यांपर्यंत उच्च दर्जाच्या अँटीबॉडी तयार होत आम्ही स्पष्टपणे पाहिले आहे.

जर्नल इम्युनिटी मध्ये प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये भट्टाचार्य यांनी सांगितले की, कोविड-१९ विरोधात रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळापर्यंत राहत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी या अभ्यासाचा विचार केला आहे. त्यात आम्हाला दिसून आले की, शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती विकसित झाल्यानंतर किमान पाच महिन्यांपर्यंत ती टिकते. हे संशोधन प्राध्यापक जान्को निकोलिच जुगिच यांनी कंडक्ट केले होते.

दरम्यान, या संशोधनाचा निष्कर्ष अशावेळी समोर आला आहे. ज्यावेळी अनेक देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. जेव्हा अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या रि-इन्फेक्शनचे प्रकार दिसून येत आहेत. अमेरिकेत हल्लीच एका व्यक्तीला ४८ दिवसांनी पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, तज्ज्ञांनी सांगितले की, जेव्हा विषाणू पहिल्यांदा पेशींना संक्रमित करतो तेव्हा इम्युन सिस्टिम कमी वेळेपर्यंत राहणाऱ्या प्लाझ्मा सेल तयार करते. तो कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडी प्रोड्युस करते. ही अँटीबॉडी इन्फेक्शन झाल्यापासून १४ दिवसांच्या आत रक्तामध्येही दिसून येते.

इम्युन रिस्पॉन्सच्या दुसऱ्या टप्प्यात दीर्घकाळापर्यंत राहणाऱ्या प्लाझ्मा सेल्स तयार होतात. त्या उच्च दर्जाच्या अँटीबॉडी विकसित करतात. त्या शरीरामध्ये दीर्घकाळापर्यंत राहतात. भट्टाचार्य आणि निकलोची जुगिय यांनी अनेक महिन्यांपर्यंत सार्स-सीओव्ही-२ मिळे संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडींचा स्तर ट्रॅक केला आहे.

त्यांनी सांगितले की सार्स-सीओव्ही-२ अँटीबॉडी किमान ५ ते ७ महिन्यांपर्यंत शरीरात राहते. त्यांचे म्हणणे आहे की, इम्युनिटी दीर्घकाळापर्यंत टिकून राहते. यूएरिझोना हेल्थ सायन्सचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट मायकल डी डेक यांनी सांगितले की, या संशोधनामुळे आम्हाला केवळ कोविड-१९ विरोधात अँटीबॉडीचे योग्य परीक्षण करण्याची क्षमताच प्रदान केली नाही तर दीर्घकाळापर्यंत रोगप्रतिकारशक्ती टिकून राहणे हे वास्तव असल्याचे दाखवून दिले आहे.