coronavirus: अखेर कोरोनाविरोधात रामबाण उपाय सापडला, असं होणार विषाणूचं काम तमाम

By बाळकृष्ण परब | Published: February 17, 2021 02:04 PM2021-02-17T14:04:00+5:302021-02-17T14:11:56+5:30

Eventually an effective remedy was found against Coronavirus : वर्षभर चाललेल्या संशोधनानंतर तज्ज्ञांना कोरोनाविरोधात रामबाण उपाय सापडला आहे. वर्षभराच्या संशोधनानंतर कोरोना विषाणूमधील कमकुवत दुवा तज्ज्ञांना सापडला आहे.

गेल्या वर्ष-सव्वा वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. दरम्यान, वर्षभर चाललेल्या संशोधनानंतर तज्ज्ञांना कोरोनाविरोधात रामबाण उपाय सापडला आहे. वर्षभराच्या संशोधनानंतर कोरोना विषाणूमधील कमकुवत दुवा तज्ज्ञांना सापडला असून, कोरोनवर कुठे प्रहार केला की तो नष्ट किंवा निष्क्रीय होईल, ते आता कळाले आहे.

UT साउथवेस्टर्न मेडिकल सेंटर (UTSW) च्या पीएचडी स्कॉलर आणि सेल बायोलॉजीच्या प्राध्यापक बीट्रिज फोंटूरा यांनी सांगितले की, आम्हाला कोरोना विषाणूचा कमकुवत दुवा समजला आहे. आता त्यावर हल्ला करणे सोपे जाणार आहे. विषाणूंनी त्यांची कमकुवत बाजू म्युटेट केलेली नाही. तर बहुतांश बाहेरील भागामध्येच बदल केले आहेत.

बीट्रिज यांनी सांगितले की, जगभरात सध्या उपलब्ध असलेल्या कोरोनावरील लसी ह्या केवळ काही काळासाठीच कोरोनापासून बचाव करू शकतात. मात्र एकदा कोरोना विषाणूच्या कमकुवत बाजूला लक्ष्य केले गेल्यास तो कायमस्वरूपी निष्क्रिय होऊन जाणार आहे. आमच्या या संशोधनाची माहिती सायन्स अॅडव्हान्स नावाच्या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे.

बीट्रिज यांनी सांगितले की, जेव्हा कोरोना विषाणू कुठल्याही पेशीला बाधित करतो. तेव्हा या पेशी ज्याप्रमाणे स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतात. किंवा संघर्ष करतात. त्याचवेळी जर कोरोना विषाणूवर हल्ला केला गेला तर तो कायमस्वरूपी निष्क्रिय होऊ शकतो. कोरोना विषाणू आपल्या होस्ट सेल म्हणजेच बाधित पेशींमधील जीन्सला स्वत:सोबत मिसळवून स्वत:ला शक्तिशाली बनवत असतो. तसेच अजून विषाणू तयार करतो.

बीट्रिज यांनी सांगितले की, जर कोरोना विषाणू मेसेंजर RNA (mRNA) ला त्याच्या केंद्रामधून काढून सायटोप्लाज्ममध्ये जाण्यापासून रोखतो. कारण mRNA सायटोप्लाझ्ममध्ये गेल्यास अँटीव्हायरल प्रोटिन तयार होईल. त्याला वाचवण्यासाठी विषाणू mRNAसोबत स्वत:ला वेगळा करतो. तसेच पेशींना संपवून स्वत:ला रेप्लिकेट करतो.

बीट्रिज फोंटुरा यांच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या पोस्टडॉक्टोरल रिसर्चर के. झांग यांनी सांगितले की, Nsp1 प्रोटिन mRNA ला बाहेर येण्यापासून अटकाव करते हे आम्ही पाहिले आहे. कारण जर mRNA बाहेर आला तर विषाणूला फैलावण्याची संधी मिळणार नाही. तसेच तो रेप्लिकेट करू शकणार नाही. विषाणू mRNA ला आपल्या मर्जीनुसार केंद्रामधून बाहेर पडू देतो.

तज्ज्ञांनी आपल्या रिसर्चमध्ये पाहिले की, Nsp1 प्रोटिन अनेक प्रकारच्या कामांमध्ये निपुण असते. तसेच हा विषाणू रेप्लिकेशन म्हणजेच प्रतिकृती बनण्यापासून रोखते. तसेच प्रतिकारक्षमता विकसित करणाऱ्या प्रोटिनलाही तयार होण्यापासून रोखते. आता तज्ज्ञांना Nsp1 प्रोटिन टार्गेट कसे करतात हे समजल्यावर कोरोना विषाणूला नष्ट किंवा निष्क्रिय करण्याचे काम अधिकच सोपे होणार आहे.

कोरोना विषाणू जेव्हा कुठल्याही कोषिकांवर हल्ला करतो तेव्हा तो Nsp1 प्रोटिनच्या माध्यमातून mRNA ला एक्सपोर्ट करतो. त्यामुळे तो एक्सपोर्ट फॅक्टर NXF1 चा उपयोग करतो. आता इथे Nsp1 चे नवे काम सुरू होते. ते अन्य प्रोटिन्सना कामाला लावते. त्यामुळे होस्ट सेल mRNA ला अँटिव्हायरल प्रोटिनमध्ये बदलू शकत नाहीत. इथेच Nsp1 प्रोटिन पेशींवर वर्चस्व मिळवते. ते विषाणूविरोधात प्रतिकार क्षमता विकसित होऊ देत नाही.

बीट्रिज आणि के. झांग सांगतात की, जर Nsp1 ला NXF1 शी जोडण्यापासून रोखले, तर आपण कोरोनाला निष्क्रिय करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. कारण हे दोघेही मिळून कोरोनाला आपली प्रतिकृती बनवण्यामध्ये सुरुवातीला मदत करतात.

बीट्रिज सांगतात की, कोरोना विषाणूच्या संसर्गावरील उपचारांमध्ये सध्या लक्षणांच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यात आलेला आहे. तर शरीर आपल्या प्रतिकार क्षमतेमधून अशा विषाणूंना हरवू शकते. सध्या माणसांनी एवढेच करायचे आहे. ते म्हणजे आपली इम्युनिटी म्हणजेच प्रतिकार क्षमता वाढवावी किवा विषाणूला पेशींमध्ये घुसण्याच्या मार्गात अटकाव करावा.

बीट्रिज यांनी सांगितले की, सध्या आम्ही अभ्यास करत आहोत. ज्यामुळे Nsp1 आणि NXF1 यांच्यामधील संबंध समजू शकतील. सध्या आम्हाला एवढेच समजले आहे की, या दोघांच्या एकत्र येण्याने विषाणू आपला संसर्ग अधिक वेगाने करू शकतो. त्यामुळे या दोघांचा संपर्क जर कायमस्वरूपी थांबवला तर कोरोना विषाणू रेप्लिकेट होऊ शकणार नाही. त्यामुळे संसर्ग फैलावण्याची शक्यता संपुष्टात येईल.