Coronavirus : WHO कडून पहिल्यांदाच खाण्या-पिण्यासंबंधी गाईडलाईन्स, जाणून घ्या काय घ्यावी काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 03:42 PM2020-05-11T15:42:17+5:302020-05-11T15:47:21+5:30

WHO कडून पदार्थांबाबत काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोबतच हेही सांगण्यात आले आहे की, या सूचना गरजेच्या का आहेत. चला जाणून घेऊन खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्याच्या 5 पद्धती...

कोरोना व्हायरसबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने वेगवेगळ्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. स्वच्छता आणि सुरक्षेबाबत वेगवेगळे दिशानिर्देश जारी केले जात आहेत. आता WHO कडून पदार्थांबाबत काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोबतच हेही सांगण्यात आले आहे की, या सूचना गरजेच्या का आहेत. चला जाणून घेऊन खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्याच्या 5 पद्धती...

जेवण तयार करताना किंवा कोणत्याही खाद्य पदार्थाला हात लावण्याआधी हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे. टॉयलेटमधून आल्यावर हात चांगले धुवावे. जेवण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेची स्वच्छता करावी. किचन स्वच्छ करा, सॅनिटाइज करा.

जास्त सूक्ष्मजीव हे आजाराचं कारण नसतात. पण अस्वच्छ जागांवर, पाणी आणि प्राण्यांमध्ये घातक सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणात असतात. हे सूक्ष्मजीव भांडी पुसण्याच्या कापडावर, किचनमधील इतर कापडांवर आणि कटींग बोर्डवर सहजपणे आढळतात. हे तुमच्या पदार्थांवर सहजपणे पोहोचू शकतात.

तसेच मांस इतर पदार्थांपासून वेगळं ठेवा. कच्चा भाज्यांसाठी किंवा पदार्थांसाठी वेगळी भांडी ठेवा. कच्च्या पदार्थांसाठी वापरलं जाणारं कटींग बोर्ड किंवा चाकूचा वापर पुन्हा धुतल्याशिवाय करू नका. कच्चे आणि शिजलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा.

कच्चे पदार्थ खासकरून मांस, त्यांचे ज्यूस यात घातक सूक्ष्मजीव असू शकतात. जेवण तयार करताना हे सूक्ष्मजीव एका पदार्थातून दुसऱ्या पदार्थात जाऊ शकतात. त्यामुळे पदार्थ वेगवेगळे ठेवावे.

पदार्थ चांगल्या प्रकारे शिजवून खावेत. खासकरून मांस. हे 70 डिग्री सेल्सिअसवर शिजवावे. पाण्याचं तापमान चेक करण्यासाठी थर्मामीटरचा वापर करू शकता. तसेच शिजलेले पदार्थ खाण्यापूर्वी एकदा चांगले गरम करावे.

अन्न चांगल्याप्रकारे शिजवल्यावर त्यातील सर्व कीटाणू मरतात. रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, 70 डिग्री सेल्सिअस तापमानावर शिजलेलं अन्न खाण्यासाठी सुरक्षीत असतं.

रूमच्या तापमानावर शिजलेले पदार्थ दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. तसेच हे पदार्थ योग्य तापमानावरच फ्रीजमध्ये ठेवा. जेवण वाढण्याआधी हे पदार्थ पुन्हा एकदा 60 डिग्री सेल्सिअस तापमानावर गरम करावे. तसेच अन्न जास्त वेळ फ्रीजमधे ठेवू नये.

रूमच्या तापमानावर ठेवण्यात आलेल्या पदार्थांवर सूक्ष्मजीव फार वेगाने वाढतात. 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आणि 60 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर हे सूक्ष्मजीव जिवंत राहू शकत नाहीत. मात्र, काही कीटाणू हे 5 डिग्री सेल्सिअस पेक्षाही कमी तापमानात वाढतात.

पिण्यासाठी आणि जेवण तयार करण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा. शक्य असेल तर पाणी पिण्याआधी उकडून घ्यावे. भाज्या आणि फळं चांगले धुवावे. ताजे आणि पौष्टिक पदार्थ खावेत.

पाणी आणि बर्फातही अनेक प्रकारचे घातक सूक्ष्मजीव असतात. जे पाण्याला विषारी बनवतात. त्यामुळे कोणतेही कच्चे पदार्थ घेताना काळजी घ्यावी आणि ते चांगले धुवूनच खावेत.