CoronaVirus News: ऑक्सफोर्डनं थांबवली लसीची चाचणी अन् चीनमधून आली 'पॉझिटिव्ह' बातमी; कोरोनातून सुटका होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 05:33 PM2020-09-12T17:33:20+5:302020-09-12T17:39:11+5:30

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं संपूर्ण जगात धुमाकूळ घातला. अमेरिका, भारतात कोरोनाबाधितांची संख्या ४० लाखांच्या पुढे आहे. त्यामुळे आता कोरोनावरील लस कधी येणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

चीननं जाणूनबुजून कोरोना पसरवल्याचा संशय संपूर्ण जगाला आहे. तसे काही पुरावेदेखील समोर आले आहेत. त्यामुळे जगभरातून चीनवर टीका झाली आहे.

कोरोनामुळे संपूर्ण जगात टीकेची धनी ठरलेला चीन आता कोरोनावरील लसीच्या संशोधनात आघाडीवर आहे. चायना नॅशनल बायोटेक ग्रुपनं त्यांची कोरोनावरील लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

चायना नॅशनल बायोटेक ग्रुपनं कोरोना लसीच्या चाचण्यांची माहिती त्यांच्या अधिकृत व्हीचॅट अकाऊंटवरून दिली. आतापर्यंत १ लाख लोकांना लस देण्यात आली असून कोणतेही साईड इफेक्ट दिसले नसल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

चीनमधील आरोग्य तज्ज्ञांनी लसीवरून पाश्चिमात्य देशांवर निशाणा साधला आहे. कोरोनाविरोधात आमची लस प्रभावी असल्याचं आम्ही पुन्हा दाखवून दिल्याचं चीननं म्हटलं आहे.

काही पाश्चिमात्य देशांनी आमच्या कोरोनावरील लसीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र आता त्या सगळ्यांनाच प्रत्युत्तर मिळालं आहे, अशा शब्दांत चिनी आरोग्य तज्ज्ञांनी पाश्चिमाच्या राष्ट्रांना लक्ष्य केलं.

कोरोना विषाणू चीनमधून पसरला असल्यानं संपूर्ण जगातून चीनवर टीका झाली. याच टीकेची झोड कमी करण्यासाठी चीन सध्या कोरोना लसीवर अतिशय वेगानं काम करत आहे.

चीननं कोरोना लसीच्या अंतिम चाचणीआधीच लसीकरण करण्यास सुरुवात केल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वीच आलं होतं.

संपूर्ण जगात कोरोनाचा विषाणू पसरवण्याआधीच चीननं आपल्या नागरिकांना कोरोनाची लस दिल्याची माहितीही समोर आली होती.

चीन २२ जुलैपासूनच आपल्या नागरिकांना कोरोनावरील लस देत असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं शनिवारी दिली. मात्र अंतिम टप्प्यात आलेल्या चारपैकी कोणत्या लसी नागरिकांना देण्यात आल्या, याची माहिती आयोगानं दिली नाही.