CoronaVirus : कोरोनाची लस सगळ्यात आधी कोणाला मिळणार? समोर आला तज्ज्ञांचा 'मास्टर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 11:47 AM2020-09-06T11:47:47+5:302020-09-06T12:02:25+5:30

कोरोना व्हायरसच्या लसींवर संपूर्ण जगभरातील वैज्ञांनिकांचे काम सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षींच्या मध्यापर्यंत कोरोना लसीचे व्यापक लसीकरण अशक्य आहे. सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणं अशक्य आहे. त्यासाठी आरोग्य तज्ज्ञांकडून सगळ्यात आधी लस कोणाला दिली जाणार हे निश्चित केलं जाणार आहे.

जागतिक स्तरावरिल आरोग्य तज्ज्ञांच्या एका टीमने लसीच्या वितरणावर योजना तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. लस वितरणासंबंधी या मॉडेलला तज्ज्ञांनी 'फेयर प्रायॉरिटी मॉडल' असं नाव दिलं आहे. या मॉडेलचे उद्दिष्ट भविष्यकाळातील कोरोना संकटांना तोंड देण्याचे आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस पहिल्यांदा गंभीर आजारांनी पिडित असलेल्या लोकांना देण्यात यावी.

दुसऱ्या टप्प्यात आर्थिक स्थितीवरून लसीचे वितरण केलं जावं असे तज्ज्ञांचे मत आहे. या स्टेजमध्ये गरिबांना लस देण्यासाठी जास्त प्रयत्न केले जाणार आहेत. जेणेकरून गरीब कुटुंबातील लोक माहामारीचे शिकार होणार नाहीत. गंभीर आजारांनी पिडीत असलेल्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लसीचे वितरण कम्युनिटी ट्रांस्फरचा धोका लक्षात घेऊन करण्यात येणार आहे. जेणेकरून व्हायरसला एका देशातून इतर देशात पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. दरम्यान व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच देशांना लसीची आवश्यकता भासणार आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या योजनेनुसार प्रत्येक देशात ३ टक्के लोकसंख्येच्या लसीकरणाला सुरूवात व्हायला हवी. त्यानंतर लोकसंख्या लक्षात घेऊन व्यापक लसीकरण केलं जावं.

अमेरिकेतील पेन्सिलवेनिया युनिव्हर्सिटीचे प्रमुख शोध लेखक ईजेकीन जे. एमानुएल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लसीचे वितरण निष्पक्षतेनं करायला हवं. शारीरिक स्थिती नाजून किंवा गंभीर असलेल्या व्यक्तीला लस सगळ्यात आधी दिली जावी. यामुळे माहामारीकाळात वाढणारा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल दोन कोटींवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत तब्बल 90,633 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 41 लाखांवर पोहोचली आहे.

कोरोनामुळे देशात 70,626 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.