रशियाच्या दुसऱ्या कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण; १५ ऑक्टोबरला लस लॉन्च होणार?, जाणून घ्या

By manali.bagul | Published: October 4, 2020 10:41 AM2020-10-04T10:41:29+5:302020-10-04T10:58:56+5:30

कोरोना लसीच्या शर्यतीत रशिया सुरूवातीपासूनच सगळ्यात पुढे आहे. सामान्य जनतेसाठी स्पुटनिक व्ही (Sputnik V) उपलब्ध करून दिल्यानंतर रशिया अजून एक लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. रशियाच्या या लसीचे नाव एपीवॅककोरोना (EpiVacCorona) आहे. वैद्यकिय चाचणीत ही लस सफल झाली असून १५ ऑक्टोबरला ही लस लॉन्च होऊ शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ही लस सैबेरियाच्या वेक्टर स्टेट वायरोलॉजी रिसर्च सेंटरमध्ये तयार करण्यात आली आहे. रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार प्रायोगिक लस एपीवॅककोरोना सुरूवातीच्या चाचण्यांदरम्यान प्रभावी ठरली आहे. वेक्टर स्टेट वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी इंटरफेस वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकिय चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यात एपीवॅककोरोना लस सुरक्षित आणि प्रभावी दिसून आली आहे.

वेक्टर रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसर एपीवॅककोरोना लस इम्यून रिस्पॉन्सवर अधिक काम करते. पोस्ट अप्रुव्हल वैद्यकिय चाचणीनंतर अंतिम निष्कर्ष दिणं सोपं होऊ शकतं. रशियाचे आरोग्यमंत्री मिखायल मुराश्को यांनी सांगितले की, मंत्रालयाकडून या लसीला तीन आठवड्यात मंजूरी दिली जाऊ शकते.

रजिस्ट्रेशननंतर सैबेरियामध्ये जवळपास ५००० स्वयंसेवकांवर वैद्यकिय चाचणी सुरू केली जाणार आहे. याव्यतिरिक्त आणखी एक परिक्षण केलं जाणार आहे. ज्यात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या १५० स्वयंसेवकांचा समावेश असेल. त्यानंतर १८ ते ६० वर्ष वयोगटातील ५००० स्वयंसेवकांवर प्लेसबो कंट्रोल्ड ट्रायल सुरू केलं जाणार आहे. ही लस तयार करण्याचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू केलं जाणार आहे. सुरूवातीला एपीवॅककोरोनाचे १०,००० डोस तयार केले जातील.

Sputnik V लॉन्च करणारा रशिया पहिला देश आहे. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे सुरूवातीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. Sputnik V लस तयार करत असलेल्या गॅमेलेया इंस्टीट्यूटचे प्रमुख अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी रॉयटर्सला यासंबंधी माहिती दिली होती.

या लसीच्या पहिल्या चाचणीचे परिणाम वैद्यकिय नियतकालिक लँसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जवळपास ४०० लोकांना ही लस देण्यात आली होती.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार वयस्कर लोकांना लसीकरण अभियानात सहभागी करून घ्यायचं की नाही याचा निर्णय तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल आल्यानंतरच घेतला जाणार आहे.

दरम्यान भारतात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. या धोकादायक विषाणूची लागण आतापर्यंत ६३ लाखाहून अधिक लोकांना झाली आहे, तर मृतांची संख्या एक लाखांवर पोहोचली आहे.