Corona Vaccination: लस घेतल्यानंतर अर्धा तास थांबा... अ‍ॅनाफिलॅक्सिस होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 02:06 PM2021-06-18T14:06:52+5:302021-06-18T14:19:22+5:30

half hour after corona vaccination is important: कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबावे, हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबावे, हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये लसीकरणानंतर ॲनाफिलॅक्सिस होण्याची शक्यता असते. पण त्यामुळे घाबरून जाऊन लस घेणे टाळू नका.. जाणून घेऊ रिॲक्शनची माहिती.

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम संभवण्याची शक्यता कमी आहे. मात्र, तरीही काही जणांमध्ये लसीचे दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता नाकारण्यात आलेली नाही.

त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे, त्वचा आणि गालांवर लाल चट्टे येणे, हातापायांना सूज येणे, गंभीर ॲलर्जी असलेल्यांना त्वचेवर मोठमोठे फोड येऊ शकतात.

डोकेदुखी वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे.

लसीची ॲलर्जी असलेल्यांना जोखीम आहे. परंतु ही लक्षणे वेळीच लक्षात आली तर त्यावर तातडीने उपचार करता येतात.

लसीमुळे ॲलर्जी आल्याने रक्तसंक्रमणात बाधा निर्माण होऊन वरीलप्रमाणे लक्षणे आढळतात. ॲनाफिलॅक्सिसमुळे रक्तपेशींमधील रसायने वाढतात आणि त्यामुळे रक्ताचा दाब कमी होतो.हृदविकाराच्या तक्रारी असलेल्यांना ॲनाफिलॅक्सिसचा धोका अधिक असतो.

ॲनाफिलॅक्सिसमुळे श्वसनात अडचणी निर्माण होऊ शकतात. शरीराला सूज येते. त्यावेळी शरीरांतर्गत प्रक्रियांवरील दाब वाढतो. श्वसनमार्गावर त्यामुळे ताण येतो.

त्यातूनच श्वसनास त्रास होणे, खोकला, सर्दी इत्यादी लक्षणे दिसू लागतात. मळमळणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठता वाढणे आदी त्रासही जाणवण्याची शक्यता असते.

वरील लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत.

कोरोनाप्रतिबंधक लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात किमान ३० मिनिटे तरी थांबावे, असा आग्रह वैद्यकीय तज्ज्ञ करतात. लसीमुळे काही दुष्परिणाम तर जाणवत नाही ना, हे या अर्धा तासात स्पष्ट होते आणि दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचार मिळू शकतात.