Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांची चिंता वाढली; अवघ्या ४ महिन्यांत 'अशी' होतेय स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 08:21 PM2021-09-15T20:21:34+5:302021-09-15T20:28:49+5:30

Corona Vaccination: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं सर्वेक्षण; चिंताजनक माहिती समोर

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसीचे ७५ कोटी डोस देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून देशातील लसीकरण अभियानाचा वेग वाढला आहे. मात्र लसीमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारशक्ती किती काळ टाकते असा प्रश्न एका संशोधनामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घ्यावा लागणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या ६१४ वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अँटिबॉडी तपासण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अँटिबॉडी चार महिन्यांनी बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. त्यामुळे भारतातही पाश्चिमात्य देशांप्रमाणे बूस्टर डोस द्यावा लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अँटिबॉडीजमध्ये घट झाली याचा अर्थ लस घेतलेल्यांनी विषाणूशी सामना करण्याची क्षमता गमावली असा काढता येणार नाही. कारण शरीरात असलेल्या मेमरी सेल्स पुरेसं संरक्षण करू शकतात, अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण होऊन ४ महिने पूर्ण झाले आहेत. ६ महिन्यांनंतरची परिस्थिती, शरीरातील अँटिबॉडीजचं प्रमाण पाहून बूस्टर डोसची गरज आहे की नाही याबद्दल नेमकं भाष्य करता येईल, असं भुवनेश्वरच्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राच्या संघमित्रा पाती यांनी सांगितलं. देशभरात विविध ठिकाणी अशा प्रकारचं संशोधन होण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या.

ब्रिटनमधील संशोधकांनी केलेल्या संशोधनातूनही लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांच्या शरीरातील अँटिबॉडीजचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती पुढे आली होती. ब्रिटिश संशोधकांनी फायझर/बायोएनटेक आणि ऍस्ट्राझेनेका लस घेतलेल्यांच्या शरीरातील अँटिबॉडीज तपासून पाहिल्या होत्या.

देशात असलेल्या १८ वर्षांवरील लोकसंख्येचा आकडा ९५ कोटींच्या आसपास आहे. यातल्या ६० टक्के व्यक्तींना कोरोना लसीचा एक डोस मिळाला आहे. मात्र अँटिबॉडीजचं प्रमाण कमी होत असल्यानं बूस्टर डोसची गरज वाटू लागली आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली. आतापर्यंत देशात सव्वा तीन कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. तर जवळपास साडे चार लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.