आयुष्मान भारत डिजिटल मिशन काय आहे? तुम्हाला त्याचा फायदा कसा होईल? जाणून घ्या, एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 04:28 PM2021-09-27T16:28:14+5:302021-09-27T16:40:59+5:30

ayushman bharat digital mission : आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी एक युनिक हेल्थ कार्ड तयार करेल.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुष्मान भारत डिजिटल मिशनची सुरुवात केली. 15 ऑगस्ट 2020 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून या मिशनच्या पायलट प्रोजेक्टची नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती.

या अंतर्गत, एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, जो डिजिटल आरोग्य इको सिस्टिमअंतर्गत इतर आरोग्याशी संबंधित पोर्टलच्या परस्पर संचालनाला सुद्धा सक्षम करेल. हे मिशन सामान्य माणसांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरेल.

आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी एक युनिक हेल्थ कार्ड तयार करेल. हे कार्ड पूर्णपणे डिजिटल असेल आणि आधार कार्डसारखे दिसेल. आधार कार्डमध्ये जसा नंबर असतो, तशाप्रकारे या हेल्थ कार्डावर एक नंबर असेल, ज्याच्या आधारावर व्यक्तीची ओळख आरोग्य क्षेत्रात सिद्ध होईल.

तुमच्याकडे युनिक हेल्थ कार्ड असल्यास, ते तुमच्यासाठी आणि डॉक्टर दोघांसाठीही फायदेशीर ठरेल. यामुळे रुग्णांना केवळ डॉक्टरांना दाखवण्यासाठी मेडिकल फाईल घेऊन जाण्यापासून सुटका मिळणार नाही, तर डॉक्टर सुद्धा रुग्णांच्या युनिक हेल्थ आयडी पाहून त्यांच्या आजारांविषयी संपूर्ण डेटा देखील काढतील.

युनिक हेल्थ कार्डच्या आधारावर पुढील उपचार सुरू केले जाऊ शकतात. याचबरोबर, या अनोख्या हेल्थ कार्डाद्वारे, रुग्णाला आयुष्मान भारत अंतर्गत उपचार सुविधांचा लाभ मिळतो की नाही, हे जाणून घेणे शक्य होईल.

या युनिक हेल्थ कार्डवरून हे देखील जाणून घेणे शक्य होईल की, रुग्णाला आरोग्याशी संबंधित विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो.

ज्या व्यक्तीचे युनिक हेल्थ कार्ड तयार केले जाईल, त्याच्याकडून आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर घेतला जाईल. याच्या मदतीने हे युनिक हेल्थ कार्ड तयार केले जाईल. यासाठी, सरकारद्वारे एक आरोग्य प्राधिकरण स्थापन केले जाईल, जे व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व प्रकारचा डेटा गोळा करेल.

सार्वजनिक रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्रे, आरोग्य आणि कल्याण केंद्रे आणि राष्ट्रीय आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर रजिस्ट्रीशी संलग्न आरोग्य सेवा प्रदाते व्यक्तीचे हेल्थ कार्ड तयार करू शकतात.

आपण स्वत: एक हेल्थ आयडी देखील तयार करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचे स्वतःचे हेल्थ रेकॉर्ड https://healthid.ndhm.gov.in/register येथे रजिस्टर करावे लागतील.