CoronaVaccine: कोरोना लशीच्या देन डोसमधील अंतर वाढवल्यास संक्रमणाचा धोका अधिक; डॉ. अँथनी फाउची यांचा इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 10:11 AM2021-06-12T10:11:09+5:302021-06-12T10:24:00+5:30

देशात कोवीशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर दोन वेळा वाढविण्यात आले आहे...

अमेरिकन महामारी रोग तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतरासंदर्भात गंभीर इशारा दिला आहे. लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने लोकांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका अधिक वाढू शकतो. इग्लंडमध्येही हे दिसून आले आहे. असेही डॉ. अँथनी फाउची यांनी म्हटले आहे. ते एनडीटीव्हीशी बोलत होते. (American expert dr anthony fauci says Extending vaccine intervals may leave people vulnerable to corona vaariants)

फाउची यांचे हे विधान भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. कारण सरकारने गेल्या महिन्यातच कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे केले आहे. यापूर्वी हे अंतर 6 ते 8 आठवडे होते.

मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळातही हे अंतर 28 दिवसांवरून 6-8 आठवड्यांपर्यंत वाढविण्यात आले होते. यासंदर्भात, दोन डोसमधील अंतर वाढविल्यास लसीचा प्रभाव वाढेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

मात्र, दोन लशींमधील अंतर वाढवण्याऐवजी आपण वेळापत्रकानुसार पुढे जायला हवे, असे अँथनी फाउची यांचे म्हणणे आहे. पण याच वेळी, आपल्याकडे लशीचा पुरवठा फारच कमी असेल तर, हे अंतर वाढविणे आवश्यक आहे, असेही फाउचीयांनी म्हटले आहे.

कोरोनाचा सर्वाधिक संक्रमक व्हेरिएन्ट डेल्टावर जोर देत फाउची म्हणाले, व्हायरसचा पराभव करण्यासाठी लवकरात लवकर लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे.

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट सर्वप्रथम भारतात सापडला होता आणि हाच व्हेरिएन्ट देशातील दुसर्‍या कोरोना लाटेचे मुख्य कारण होते, असे म्हटले जाते.

तज्ञांच्या मते, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएन्ट हा 40 ते 50 टक्के अधिक संसर्गजन्य आहे.

फाउची यांच्या म्हणण्यानुसार, भारतातील बर्‍याच राज्यांत डेल्टा व्हेरिएन्टचा प्रादुर्भाव झाला आहे. हा व्हेरिएन्ट एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत फार वेगाने आणि प्रभावीपणे पसरतो.

ज्या देशांमध्ये हा व्हिरिएन्ट आढळला आहे. त्या देशांत संसर्ग वाढण्याचा धोका आहे. महत्वाचे म्हणजे, एखाद्या देशाकडे लस नसल्यास त्या देशासाठी हा चिंतेचा विषय आहे, असेही फाउची म्हणाले.

लसीकरण न झालेल्या लोकांना डेल्टा व्हेरिएन्टचा धोका अधिक - फाउची म्हणाले, जेव्हा डेल्टा व्हेरिएन्ट लसीकरण न झालेल्या व्यक्तीला संक्रमित करतो, तेव्हा तो फार वेगाने आपला प्रभाव दाखवतो. इंग्लंडमध्ये असे दिसून येत आहे.

आता हा व्हेरिएन्ट 90% पर्यंत त्याचा प्रभाव दाखविण्याच्या जवळ आहे. एवढेच नाही, तर कोरोनाच्या पुढील लाटेपासून सुरक्षित राहायचे असेल तर लवकरात लवकर लसीकरण करणे आवश्यक असल्याचेही फाउची यांनी म्हटले आहे.