कोरोनाकाळात थंडीच्या वातावरणात कसे राहाल निरोगी? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या ८ टिप्स

By manali.bagul | Published: November 2, 2020 05:03 PM2020-11-02T17:03:17+5:302020-11-02T18:29:18+5:30

हिवाळा आणि सण उत्सवांचा काळ सुरू झाला की लोक तयारीला लागतात. यावर्षी कोरोनाच्या माहामारीने कहर केला आहे. त्यामुळे थंडीच्या वातावरणात कोरोनाकाळात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. डायटिशियन स्वाती बथवाल यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

दिवसाची सुरूवात एक ग्लास लिंबू पाणी किंवा कोमट पाण्याने करा: तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास, सकाळी रिकाम्या पोटी 6-7 पाण्यात भिजवलेल्या मनुके खा. मनुके खाल्ल्यास तुमची बद्धकोष्ठता दूर होईल, अशक्तपणा येणार नाही आणि पोटही चांगले राहिल. याशिवाय सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहील.

हेल्दी फॅट्सचा आहारात समावेश करा: जेवणात तीळ तेल, शेंगदाणा तेल यांचा वापर करा. जर तुम्ही दररोज सकाळी मूठभर तीळ खाल्ल्या तर ते तुमचं शरीर चांगले राहिल याशिवाय आर्यन, कॅल्शियम, व्हिटामीन ई शरीराला मिळल्याने पोषक घटकांची कमतरता भरून निघेल.

भाज्यांचे सेवन करा: हिवाळ्यात हिरव्या भाज्या, कोथिंबीर, पुदीनाची पाने, बीटची पाने, मेथी, पालक आणि आवळा अशा भाज्याचे सेवन करा. त्यामुळे लोह, फायबर, फॉलिक एसिड मिळेल.

हळदीचे दूध: हळदीचे दूध किंवा मसाल्याच्या दुधाचे सेवन करा. हळदीच्या दुधाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय आपल्या शरीरावर आणि तोंडाला चांगले मॉइश्चरायझर वापरा. चेहरा मॉइश्चराईज करण्यासाठी नारळाच्या तेलाचे काही थेंब किंवा तूप लावा.

ताण तणावापासून लांब राहा: ताण घेतल्याने मानसिक स्थितीसह शरीरावरही परिणाम होतो. लठ्ठपणा, रक्तदाब, हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून स्वतःला ज्या गोष्टींना आनंद मिळतो ते करण्याचा प्रयत्न करा. रोज व्यायाम करा.

व्हिटामीन डी: दिवसातून 20-30 मिनिटे सकाळी उन्हात बसा. व्हिटॅमिन डी शरीराला सूर्यप्रकाशामुळे मिळते. व्हिटॅमिन डी केवळ प्रतिकारशक्ती वाढवत नाही तर हाडे मजबूत करते. त्यामुळे मूड चांगला राहतो. रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करण्यासह वजन कमी करण्यास मदत होते.

सीजनल फळं खा : आवळा, पेरू, डाळिंब, सफरचंद आणि द्राक्षे ही फळं हिवाळ्यात जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा. कारण या सर्व फळांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट्स, फायबर आणि फॉलिक एसिड असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.