Diwali 2018: भेसळयुक्त खव्याने कॅन्सरचा धोका, कसा ओळखाल शुद्ध-अशुद्धता?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 05:14 PM2018-11-05T17:14:45+5:302018-11-05T17:20:19+5:30

मिठाई नसेल तर कोणताही सण पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्यात दिवाळीत तर मिठाई आणि फराळाची अधिकच मजा असते. कोणताही सण असला की, खव्याची मोठी मागणी असते. त्यामुळे याच दिवसात खवा आणि मिठाईंमध्ये भेसळ करुन विक्री केली जाते. अशात या फसवणूकीपासून तुमचा बचाव करण्यासाठी आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आम्ही भेसळयुक्त खवा कसा ओळखावा याच्या टिप्स देत आहोत.

खवा घेताना आधी थोडा अंगठ्याच्या नखावर रगडा आणि काही वेळाने चेक करा. जर खवा भेसळयुक्त नसेल तर त्याचा सुगंध बराच वेळ येत राहिल.

खवा शुद्ध आहे की, भेसळयुक्त हे चाखूनही तपासता येतं. त्यासाठी खवा खरेदी करताना आधी थोडा खाऊन बघा. चव जर जरा आंबट किंवा वेगळी लागली तर त्यात भेसळ झाली आहे हे समजा.

थोडा खवा घेऊन त्याची गोल गोळी तयार करा. जर या गोळीला भेगा पडल्या तर समजा की, यात भेसळ झाली आहे. इतकेच नाही तर खवा हातात घेतांना त्यात चिकटपणा लागत नसेल तर यात भेसळ झाली आहे हे समजा.

खवा तपासण्यासाठी आणखी एक पर्याय म्हणजे एका भांड्यात थोडं पाणी टाका आणि ते गरम करा. पाणी गरम झाल्यावर त्यात टिंचर आयोडीनचे काही थेंब टाकावे. जर खव्याचा रंग बदलला तर त्यात भेसळ झाल्याचं समजा. जर तसं नाही झालं तर खवा शुद्ध आणि चांगला आहे.

खव्यामध्ये भेसळ करण्यासाठी सिंथेटिक दुधाचा वापर केला जातो. भेसळयुक्त खवा खाल्ल्याने कॅन्सर होण्याचा धोका असतो. इतकेच नाही तर अशुद्ध खव्याचं सेवन केल्याने लिव्हरवर सूज आणि आतड्यांना संक्रमण होण्याचाही धोका असतो.