... म्हणून मैद्याऐवजी रवा वापरणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:51 PM2019-02-08T12:51:37+5:302019-02-08T13:00:27+5:30

स्वयंपाक घरामध्ये सहज आढळून येणारा आणि प्रामुख्याने आहारामध्ये समाविष्ट होणारा पदार्थ म्हणजे रवा. साधारणतः शिरा, उपमा, इलडी, डोसा यांसारखे अनेक पदार्थ तयार करण्यासाठी रव्याचा वापर करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा रवा आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.

मैदा आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे आपण सारेच जाणतो. त्याऐवजी तुम्ही रवा वापरण्यास सुरुवात करू शकता. रव्यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट्स फ्री राहू शकता. तसेच यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं. एवढचं नाही तर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर रव्याच्या पदार्थांचा आहारात समावेश करा. जाणून घेऊयात रव्याचा आहारामध्ये समावेश केल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत...

डायबिटीजच्या पेशंट्ससाठी रव्याचा आहारामध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. कारम यामध्ये आढळून येणारं ग्लायसेमिक अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा धोका कमी असतो.

आहारात रव्याचा समावेश केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

रव्यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणात असतं. हे शरीरामधील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करतं. तसेच अॅनिमिया सारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी मदत होते.

आपण ज्या पदार्थांचं सेवन करतो, ते ज्यावेळी हळूहळू पचतं त्यावेळी सतत भूक लागत नाही. रव्यमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर आढळून येतं. त्यामुळे जास्त भूकही लागत नाही. मुख्य म्हणजे, यामध्ये फॅट्स आणि कोलेस्टेरॉल आणि सोडियम नसतं.

रव्यामध्ये आवश्यक पोषक तत्व आढळून येतात. म्हणजेच फायबर, व्हिटॅमिन-बी कॉम्पलेक्स आणि व्हिटॅमिन-ई, मिनरल्स इत्यादी.

रव्यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असतात त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. नाश्त्यामध्येही रव्याने तयार करण्यात आलेल्या पदार्थांचा समावेश केल्याने हृदय आणि मूत्रपिंडाचं आरोग्य राखण्यास मदत होते. तसेच हाडं आणि स्नायूंना बळकटी देण्यासाठीही मदत करतं.