Bigg Boss Marathi 3: ‘बिग बॉस’चे नवे घर पाहिलेत का? पाहा, एक झलक आणि यंदाची खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 07:45 AM2021-09-18T07:45:57+5:302021-09-18T07:57:52+5:30

Bigg Boss Marathi 3 House: ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असून, बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी नव्या असणार आहेत. पाहा, एक झलक...

छोट्या पडद्यावरील सर्वात जास्त वादग्रस्त शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. (Bigg Boss Marathi 3)

‘बिग बॉस मराठी’ चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित खेळ येत्या १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आणि नंतर दररोज रात्री ९.३० वाजता कलर्स चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. (bigg boss marathi season 3 house)

नुकतेच कार्यक्रमाचे काही प्रोमो वाहिनीकडून प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रोमो पाहून प्रेक्षक कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. (some pics of bigg boss marathi season 3 house)

वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकाच घरात तब्बल ९० दिवस राहण्यासाठी येतात. काहींची एकमेकांसोबत गट्टी जमते तर काही एकमेकांचे कट्टर वैरी होतात.

९० दिवस कार्यक्रमात टिकून राहण्याचं आव्हान सहभागी होणाऱ्या प्रयेक कलाकारासमोर असतं. त्यातही बिग बॉसची आज्ञा पाळत त्यांनी दिलेले टास्क इमाने इतबारे पूर्ण करत स्वतःला सिद्ध करून दाखवायची चुरस या सगळ्याच सदस्यांमध्ये असते.

लवकरच आपण आपल्या आवडत्या कलाकारांना बिग बॉसच्या घरात आपले मनोरंजन करताना पाहणार आहोत. वेळोवेळी त्यांचा क्लास घ्यायला, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर विकएण्डला येत होते.

या खास भागांना ‘विकेण्डचा डाव’,असे नावं दिले गेले होते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये विकेण्डचा डाव नाही तर ‘बिग बॉसची चावडी’ असे नाव देण्यात आले आहे.

मी खेळात खुप गुंतून जातो, मात्र यंदा मी खुप सरळ वागणार आहे. मी जास्त गुंतणार नाही, कारण मी आता माझे १०० टक्के देऊ शकत नाही. मला डॉक्टरांनी १०० टक्के काम करायला परवानगी दिली नाही आहे. त्यामुळे मी जास्त चिडचिड नाही करणार, असे महेश मांजरेकरने म्हटले आहे.

मागील दोन सिजनमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकून घेत स्पर्धकांनी घरातील त्यांचं स्थान कायम केलं होतं. यावेळेस कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक कसा खेळ खेळणार हे लवकरच कळेल.

'बिग बॉस मराठी'च्या सीझन ३ मध्ये अभिनेत्री गायत्री दातार, संग्राम समेळ,नेहा जोशी, शाल्मली खोलगडे, आनंद इंगळे, चिन्मय उदगीर, पल्लवी सुभाष हि मराठीतील तगडी मंडळी यावेळी शोमध्ये दिसून येऊ शकते अशी चर्चा सुरु आहे.

याशिवाय अलका कुबल, अंशुमन विचारे, सई रानडे, रुपाली नंद, गायक संतोष चौधरी, शुभांकर तावडे, कमलाकर सातपुते, आदिश वैद्य यांची नावेही चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, बिग बॉस मराठी सिझन तीनच्या स्पर्धकांविषयी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली असून, कोणत्याही स्पर्धकाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

यापूर्वी बिग बॉसचे मराठीचे २ सीजन खूपच धमाकेदार ठरले होते. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात अभिनेत्री मेघा धाडे हि विजेती ठरली होती.

तर दुसऱ्या पर्वात अभिनेता शिव ठाकरे विजेता ठरला होता. या दोघांनाही मोठी पसंती मिळाली होती. दरम्यान, नवा तिसरा सिझन तब्बल १४ आठवडे ९९ दिवस चालणार आहे. तसेच यावेळी बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी नव्या असणार आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या घरी यावेळी वेगळेपण असणार आहे. हे वेगळेपण म्हणजे यावेळी बिग बॉसच्या घरात जास्तीत-जास्त मराठमोळा टच असणार आहे. त्यामुळे घराची रचनासुद्धा अशीच करण्यात आली आहे. मराठी नाटकांचा प्रत्यय आणणारं डेकोरेशन यावेळी घरी करण्यात आलं आहे.