लव्हमॅरेजनंतर तीन वर्षांनी जावई सासरवाडीस आला, सासरच्यांनी असा पाहुणचार केला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 01:31 PM2021-06-18T13:31:06+5:302021-06-18T13:42:56+5:30

Crime News: या प्रेमी जोडप्याने तीन वर्षांपूर्वी घरातून पळून जात कोर्ट मॅरेज केले होते, मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांना पुन्हा मूळ गावी यावे लागले होते...

राजस्थानमधील धौलपूर येथे एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणाने तीन वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केले होते. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या माहेरचे कुटुंबीय नाराज होते. त्यामुळे संधी मिळताच या तरुणाच्या सासरच्या मंडळींनी जावयाची पिटाई केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडिताला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

पीडित तरुणाच्या पत्नीचा आरोप आहे की, तिने कुटुंबीयांच्या विरोधात जात लव्ह मॅरेज केले होते. तेव्हापासून तिचे कुटुंबीय डाव धरून होते. युवतीने सांगितले की, जेव्हा तिला तिच्या पतीला मारहाण होत असल्याचे समजले तेव्हा ती घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या पतीला रुग्णालयात दाखल केले.

ही घटना धौलपूर जिल्ह्यातील बाडी ठाणे परिसरात घडली आहे. तिथे मलिकपाडा मोहल्ला येथे राहणाऱ्या तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमप्रसंग होते. मात्र या तरुणीच्या नातेवाईकांना हे नाते मान्य नव्हते. मग या प्रेमी जोडप्याने २७ सप्टेंबर २०१८ रोजी घरातून पळून जात कोर्ट मॅरेज केले आणि आरामात राहू लागले.

पीडिताच्या पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यात तिने सांगितले की, दोन्ही कुटुंबांनी आपल्या कुटुंबीयांविरोधात जाऊन २७ सप्टेंबर २०१८ रोजी घरातून पळून जात लग्न केले होते. तेव्हापासून तिचे कुटुंबीय तिच्या विरोधात गेले होते. गेली तीन वर्षे आम्ही दोघेही जीव मुठीत धरून भटकत होतो. मात्र कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे काम ठप्प झाले आणि उपासमारीची वेळ आली. त्यामुळे आम्ही मूळ गाव असलेल्या मलिक पाडा येथे परत आलो.

या महिलेने पोलिसांना सांगितले की, आम्ही आल्याचे समजताच माझ्या कुटुंबीयांनी माझ्या पतीला जिवे मारण्यासाठी संधी शोधण्यास सुरुवात केली. त्याचदरम्यान कालच्या रात्री माझे पती घरी बसलेले असताना अचानक माझ्या कुटुंबीयांसह एक डझनभर लोक लाठ्या काठ्या घेऊन आले आणि त्यांनी माझ्या पतीवर हल्ला केला.

दरम्यान, जखमी नीरजने पोलिसांना सांगितले की, मी घरी बसलो होतो. त्याचदरम्यान माझ्या पत्नीचे भाऊ आले आणि त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. आम्ही कोर्ट मॅरेज केले होतो तसेच आम्ही गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहोत, त्यामुळेच ते मला मारहाण केली.

या प्रकरणी बाडी ठाण्याचे एसएचओ गजानंद चौधरी यांनी सांगितले की, हरिजन बस्तीमधून मला एक फोन आला. इथे हाणामारी होत आहे, असे त्या फोनवरून कळवण्यात आले. दरम्यान, पोलिसांच्या गस्तीपथकाची गाडी तिथे पोहोचली तेव्हा पाहिले की एक व्यक्ती जखमी होऊन पडली होती त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी व्यक्तीच्या पत्नीने रिपोर्ट दाखला केला की माझ्या माहेरच्या आणि परिसरातल्या काही लोकांनी माझ्या पतीला मारहाण केली. गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात अपहरणासारखे काही घडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.