पॉलीग्राफ चाचणीत आफताबनं दिला चकवा, ५ पुराव्यांपैकी एक मिळणं अशक्य; आता एकच पर्याय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 08:21 AM2022-11-28T08:21:55+5:302022-11-28T08:26:27+5:30

श्रद्धाचे तुकडे केल्यानंतर आफताब अगदी बेफिकीरपणे वागत होता. आपण पोलीस आणि कायद्याला व्यवस्थित चकमा देऊ असा त्याला विश्वास होता. पण खून करुन सहा महिने मोकाट फिरणारा आफताब आज तुरुंगात आहे. आरोपीला दिल्लीच्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या खून प्रकरणातील आरोपी आफताबची गेल्या तीन दिवसांपासून पॉलीग्राफ चाचणी घेतली जात आहे.

२८ नोव्हेंबरला त्याची पुन्हा पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. ज्यात उर्वरित प्रश्न विचारले जातील. आतापर्यंत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरं न देता त्यानं पोलिसांना गोंधळात टाकलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणाचं गुढ उकलण्यासाठी नार्को चाचणीवरच पोलिसांची मदार आहे.

FSSL चे सहाय्यक निर्देशक आणि पीआरओ संजीव गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार आज फॉरेन्सिंक सायन्स लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. पॉलीग्राफमध्ये अनेक सेशन असतात. यातील जे उर्वरित सेशन होते ते आज पूर्ण केले जाणार आहेत. याआधीचं सेशन जेव्हा केलं गेले तेव्हा आरोपीच्या आरोग्या संदर्भात काही अडचणी होत्या त्यामुळे काही गोष्टी बाकी राहिल्या आहेत. तसंच नार्को चाचणीसाठी आमची लॅब आणि आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

आफताबला कोर्टासमोर दोषी ठरवण्यासाठी पोलिसांना महत्वाचे पुरावे हाती लागणं गरजेचं आहे. कारण पुराव्यांच्याच मदतीनं आफताबवरील आरोप सिद्ध होऊन त्याला कठोर शिक्षा होऊ शकते. यामुळेच पोलीस शक्य होईल तितक्या पद्धतीनं कसून याप्रकरणाची चौकशी करत आहेत. पण ज्या ठोस पुराव्यांमुळे आफताबला शिक्षा ठोठावण्यास मदत मिळू शकते असा एकही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

पाच महत्वाच्या पुराव्यांपैकी सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे श्रद्धाचा मोबाइल आता पोलिसांच्या हाती लागणं जवळपास अशक्य झालं आहे. कारण मुंबईच्या ज्या भाईंदरच्या खाडीत श्रद्धाचा मोबाइल शोधण्याचं काम पोलीस करत होते ते काम आता थांबवण्यात आलं आहे. तज्त्रांच्या सल्ल्यानुसार श्रद्धाचा मोबाइल ज्या ठिकाणी फेकण्यात आला होता तो आता तिथं असणं निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे पोलिसांनी तपास थांबवला आहे.

श्रद्धाचं शीर, शरीराचे सर्व तुकडे आणि डीएनए रिपोर्ट, हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार, श्रद्धाचे कपडे जे तिची हत्या झाली त्यावेळी तिनं परिधान केले होते आणि पाचवा महत्वाचा पुरावा म्हणजे तिचा मोबाइल.

आफताबची नराधमी वृत्ती किती भयंकर आहे याचा अंदाज लावता येईल की पॉलीग्राफ चाचणीत त्यानं पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित चकवा दिला आहे. तो काही प्रश्नांवर गप्पच राहिला. काही प्रश्नांची उत्तरं त्यानं दिलीच नाहीत. तर काही प्रश्नांची उत्तरं त्यानं अर्धवट दिली. इतकंच नाही तर काही प्रश्नांच्या उत्तरात तो फक्त हसला बाकी काहीच बोलला नाही. आता उर्वरित प्रश्न आज विचारले जाणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार ५ डिसेंबर रोजी आफताबची नार्को चाचणी होण्याची शक्यता आहे.

आफताबच्या आरोपींसाठी तिहार तुरुंग प्रशासनाची आधीपासूनच तयारी होती. आफताबची सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनानं आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आफताबला वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्या सेलमध्ये आफताबसोबत इतर कोणताही कैदी नाही. तसंच सेलच्या बाहेर २४ तास एक पोलीस हवालदार तैनात असतो. जो त्याच्यावर नजर ठेवून आहे. आफताबला ठेवण्यात आलेला सेल असा आहे की ज्यातून कैद्याला लवकर बाहेर काढता येत नाही. सीसीटीव्ही कॅमेराची देखील आफताबवर नजर आहे. आफताबला जेवण देण्याआधी जेवणाचीही तपासणी केली जाते.

श्रद्धा हत्याप्रकरणाबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यातच पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत की जीची आफताबसोबत नकळतपणे भेट झाली होती. तिच्याकडून काहीतरी माहिती मिळेल या हेतूनं पोलिसांनी प्रयत्न केला. आफताब एका डेटिंग अॅपचा वापर करत होता. त्यामाध्यमातून त्यानं अनेक मुलींशी मैत्री केली होती. याच डेटिंग अॅपच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या एका मुलीला त्यानं आपल्या घरी बोलावलं होतं. पोलिसांनी याच मुलीचा शोध घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही मुलगी व्यवसायानं मानसोपचारतज्त्र आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तिच्याकडून आफताबबाबत काही महत्वाचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.