Coronavirus: ऑफिसमध्ये मास्क काढून जोरजोरात खोकला अन् म्हणाला मला कोरोना झालाय; २२ जण संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 05:46 PM2021-04-25T17:46:34+5:302021-04-25T17:52:07+5:30

Coronavirus: जगात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून अनेक जण यात संक्रमित होत आहेत. भारतातही कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे.

जगभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. यातच स्पेनमधून एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ज्याच्यावर २२ लोकांना कोरोना संक्रमित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

न्यूज एजेन्सी एएनआयने रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, हे प्रकरण स्पेनच्या मलोर्का शहरातील आहे. शनिवारी ४० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली. हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होता. जाणूनबुजून या व्यक्तीने २२ लोकांना कोरोना संक्रमित केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक वृत्तापत्रांनुसार, कोरोना व्हायरसचे लक्षण असल्याने त्याने टेस्टिंग केलं. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं तरीही तो सर्वसामान्यांप्रमाणे वागत होता. त्याच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, ताप असतानाही तो ऑफिसला येत होता. तपासातही ते आढळून आलं

पोलिसांनी सांगितले की, या आरोपीने कार्यालयात जोरात खोकला आणि चेहऱ्यावरील मास्क हटवून मी सगळ्यांना कोरोना संक्रमित करणार असं ओरडला. त्यानंतर कार्यालयात हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

या आरोपीने ८ लोकांना कोरोना संक्रमित केले आहे. तर १४ जणांना अप्रत्यक्षणपणे कोरोना झाला आहे. ज्या लोकांना कोरोना झालाय ते त्याच्या कार्यालयात काम करतात तर काही जीममध्ये वर्क आऊट करतात.

ज्या लोकांना कोरोना झालाय त्यात ३ मुलांचाही समावेश आहे. ज्यांचे वय १ वर्षही आहे. सध्या आरोपीच्या संपर्कात आलेले जे पॉझिटिव्ह आढळले ते आयसोलेटमध्ये आहेत. याशिवाय अनेकांनी स्वत:ची टेस्टिंग करून घेतली आहे.

स्पेनमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. याठिकाणी महामारीने धोकादायक स्वरुप घेतले आहे. संक्रमणासोबतच मृतकांचा आकडाही वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे स्पेन सरकारची चिंताही वाढली आहे.

स्थानिक मीडियाने सांगितले की, कोरोना व्हायरस प्रकरणात अशाप्रकारे बेजबाबदारपणा जीवाशी येऊ शकतो. या प्रकारामुळे आरोपीने स्वत:सह अन्य लोकांचे जीवही धोक्यात घातले आहेत. वेळ चांगली होती म्हणून पोलिसांनी वेळीच आरोपीला अटक केली.

एकीकडे जगात कोरोनाचा कहर आहे तर दुसरीकडे काही लोक जाणूनबुजून असं कृत्य करून दुसऱ्यांचे जीव धोक्यात घालत असल्याचं उघड होत आहे.

भारतातही कोरोना व्हायरसचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्ण कोरोनामुळे जीव गमावत आहेत. राजधानी दिल्लीसह अनेक ठिकाणी स्मशानभूमीबाहेर रांगा लागल्या आहेत.